दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अशा पाहणीतून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं,
मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर काही कॅबिनेट मंत्री झाडून पुसून कामाला लागल्याचे चित्र विविध वृत्तवाहिनीवर पाहायला मिळाले.अनेक मंत्र्यांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या विभागांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.ही पाहणी करताना मंत्रीमहोदय नजरेस आलेल्या गैरप्रकाराबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांना झापायला देखील विसरत नाहीत.चांगली गोष्ट आहे,कारण अधिकारीवर्गाला अनागोंदी कारभाराबद्दल फैलावर घेतलेच पाहिजे.पण त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवं.अन्यथा मंत्र्यांची पाठ फिरली की पुन्हा ” ये रे माझ्या मागल्या,” तसं झाल्यास मंत्र्यांची ही कृती ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” असे होईल.त्यामुळे या मोहिमेतून काहीतरी चांगलं निर्माण होईल,व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होईल,अधिकारीवर्ग झाडून कामाला लागतील,अशी अपेक्षा आहे.
काल समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या एका वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली.या पाहणी दरम्यान वसतिगृहाची झालेली दुर्दशा,अस्वच्छता,
बियरच्या रिकाम्या बाटल्या,दुर्गंधीयुक्त संडास, अश्मयुगीन बिछाने व चादरी पाहून शिरसाट यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.त्यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.” जनावरे देखील या गृहात राहणार नाहीत,” असा दावा त्यांनी यावेळी केला.वसतिगृह कसे असू नये,याचे हे उत्तम उदाहरण असावे.या वसतिगृहाला भेट देणार असल्याचे कळवूनही या वसतिगृहाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाहीत,यावरून नोकरशाही किती गेंड्याची कातडी बनली आहे,हे स्पष्ट होत आहे.गैरसोयीने युक्त आश्रमशाळा,गलिच्छ
वसतिगृह,नित्कृष्ट अन्नधान्य,विजेची बिले वेळेवर न भरणे,रात्री दारूच्या पार्ट्या करणे,असे प्रकार सतत घडत असतात.पण या अशा गैरप्रकारांवर समाजकल्याण विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत.कारण या सर्व गैरप्रकारामध्ये खालून वरपर्यंत सारे सहभागी आहेत.कारण सरकारी कामकाजात हल्ली मॅनेज संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आले आहे.काल जे शिरसाट यांना पाहायला मिळाले,ते काही आताच होत आहे,असे नाही तर अनादिकालापासून ते सुरूच आहे.वास्तविक स्थानिक लोकप्रतिनिधी व चौथा स्तंभ असलेल्या मीडियाने अशा कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे.पण हे दोघे पण या साखळीत सामील आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील या व्यवस्थेला आता वाळवी लागली आहे.शिरसाट यांनी याकामी पुढाकार घेतला आहे,ही आनंदाची बाब आहे,पण त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हायला हवे,अन्यथा ” सवंग लोकप्रियतेसाठी केलेला अट्टाहास,” असे चित्र निर्माण होईल.

