दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
ममता बॅनर्जीं यांचा उद्धव ठाकरे होणार…
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे जे काही झाले तेच तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये ज्या काही राजकीय हालचाली होत आहेत, त्यावरून लवकरच भूकंप होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींना वगळून नवीन टीएमसी स्थापन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे संकेत मिळत आहेत.दोन आमदारांना पक्षातून काढल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उलथापालथी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणेच टीएमसीमध्ये फूट पाडण्याचा ‘महाराष्ट्र मॉडेल’ वापरला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यापासून राजकीय वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. सततच्या राजीनाम्यांमुळे ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला सुद्धा सतत धक्के बसले आहेत. आता, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना वगळून एक नवीन तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांना राज्यातील राजकीय वर्तुळात जोर चढला आहे. सही प्रकरणी पक्षाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल (व्हिसलब्लोअर बनल्याबद्दल) टीएमसीचे २ आमदार ऋतब्रता बंदोपाध्याय आणि संदीपान साहा पक्षातून काढून टाकण्यात आल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं.
पक्षाने दोन आमदारांना पक्षातून काढून टाकल्यानंतर, आता बंगालमध्ये ” महाराष्ट्र मॉडेल, ” ची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा होत आहे.२०२२ साली महाराष्ट्रात शिवसेनेत व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी फूट पाडली होती, तशीच तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची योजना आखण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकांपासून बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. आता, दोन आमदारांच्या हकालपट्टीमुळे पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. सुमारे ५० आमदार तृणमूल काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. तसेच काही खासदारही बंड करण्याच्या तयारीत आहेत.
पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या घरी बोलावण्यात आलेल्या बैठकीला बरेच आमदार अनुपस्थित होते. तर काहींनी प्रमुख नेतृत्वाविरोधात उघडपणे भूमिका मांडली. तसेच पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोपावरून काहींना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे.
मात्र पक्षांतर्गत अशांततेसाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच पक्षातील एक गट तसेच भाजपला जबाबदार ठरवत आरोप करण्यात येत आहेत. धमक्या आणि लाचखोरीच्या माध्यमातून भाजप हा, तृणमूलच्या आमदार आणि खासदारांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
भाजप सरकारवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी यांनी एका फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये असा दावा केला की, ” पोलीस आपल्याला धमकावत असल्याची तक्रार ४ आमदारानी माझ्याकडे केली आहे. सभेला उपस्थित राहिल्यास त्यांना शस्त्र कायद्यान्वये अटक करण्यात येईल, अशी धमकी त्यांना देण्यात आली.
याआधी गेल्या शनिवारी सकाळी, तृणमूलच्या ८० आमदारांपैकी किमान ६० आमदार कालीघाट येथील बैठकीला गैरहजर होते. त्याच वेळी काही आ. रथिन घोष यांच्या घरी जमले होते. ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला उपस्थित न राहिलेल्यांमध्ये रथिन यांचाही समावेश होता. “माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही.” असं त्यांनी आपल्या खुलाश्यात स्पष्ट केले होते.

