दीपक मोहिते,
चबाहर बंदर व टॅरिफ ; भारताचे परराष्ट्र धोरण चांगलेच अंगलट,
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपले मित्र असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही दावे करत असले तरी अमेरिका गेल्या सहा महिन्यांपासून भारताची आर्थिक कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाही. मध्यंतरी आपण रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू लागल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या विरोधात ५० टक्के टॅरिफचे हत्यार उपसले. त्यामुळे आपल्या निर्यातीवर त्याचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे.
डोनाल्ड ट्रम्प एवढे करून थांबले नाहीत, तर सध्या सुरू असलेल्या युद्धात त्यांनी इराणमधील चबाहर या महत्वाकांक्षी बंदर परिसरात प्रखर बॉम्बहल्ले चढवले. हे बंदर, भारत व इराण संयुक्तपणे उभारत आहेत. या बंदराच्या उभारणीसाठी भारताने अब्जावधी निधी ओतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी धोरणाने आपली चांगलीच आर्थिक कोंडी केली आहे. या बंदरामुळे भारताला पाकिस्तानला बगल देऊन अफगाणिस्तान व मध्य आशियातील देशात मालवाहतूक करणे शक्य झाले आहे. दोन वर्षांपूर्वी मे २०२४ मध्ये भारत व इराण यांच्यामध्ये या महत्वाकांशी बंदरासंदर्भात १० वर्षाचा करार करण्यात आला. ” इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड,” या कंपनीच्या माध्यमातून सध्या या बंदराचे संचालन व व्यवस्थापन करण्यात येत आहे. चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या ” ग्वादर,” या बंदराला शह देण्यासाठी हे बंदर अत्यंत उपयुक्त असे आहे. चबाहर हे बंदर इंटरनॅशनल नॉर्थ – साऊथ ट्रान्सपोर्ट कोरिडॉरचा एक मुख्य भाग असून जो आपल्या देशाला इराणमार्गे रशिया व युरोपला जोडतो. पण सध्या सुरू असलेल्या युद्धात बंदराची सुरक्षा आणि व्यवहारावर मोठा परिणाम होत आहे. अमेरिकेने गेल्या महिन्यात या बंदराच्या परिसरात प्रखर बॉम्बहल्ले चढवले. या बंदराच्या विकासासाठी भारताने प्रचंड गुंतवणूक केली आहे. भारतीय माल पाकिस्तान ऐवजी थेट अफगाणिस्तान व मध्य आशियापर्यंत पोहोचू शकेल, असा हेतू हे बंदर उभारण्यामागे होता. इराणला एकटे पाडण्यासाठी ट्रम्प यांनी चबाहर बंदर परिसरात हल्ले व टॅरीफ याचा बेमालूम वापर केला. त्यामुळे दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे परराष्ट्र मंत्रालय सध्या विचलित झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मर्जी सांभाळणे व चीनचे आशिया खंडात हातपाय पसरणाऱ्या धोरणाला पायबंद घालण्यासाठी मोदी सरकारने जी धोरणे आखली तीच धोरणे, आता भारताच्या राजनैतिक स्वातंत्र्यावर मर्यादा आणू पाहत आहेत.

