दीपक मोहिते,
रणनिती,
पालघर जिल्ह्याच्या राजकारणात लवकरच ट्विस्ट,
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ.हितेंद्र ठाकूर हे लवकरच धक्कादायक खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत.पालघर जिल्ह्यातील राजकारणावर असलेली त्यांची पकड लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे वरिष्ठ नेते,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बाळासाहेब थोरात,हे त्यांच्या संपर्कात आहेत.पण आ.हितेंद्र ठाकूर हे सध्या ” वेट अँड वॉच,” च्या भूमिकेत आहेत.भाजप,जिल्ह्याच्या राजकारणात कशी खेळी करते,याकडे त्यांचे लक्ष आहे.आ.ठाकूर यांच्या पक्षाने दोन वर्षांपूर्वी महायुती सरकारला सहयोगी पक्ष म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला आहे.महायुतीला सरकार बनवताना आमदारांची गरज असताना आ.ठाकूर यांनी हा पाठिंबा देऊ केला होता.त्यामुळे भाजप वसई,नालासोपारा व बोईसर या तीन जागांबाबत काय निर्णय घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आ.हितेंद्र ठाकूर यांची भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशी असलेली घनिष्ठ मैत्री ही सर्वश्रुत आहे.त्यामुळे भाजप कोणताही निर्णय घेताना आ.ठाकूर यांना विश्वासात घेतल्याशिवाय टोकाचे पाऊल उचलणार नाही,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसात आ.ठाकूर हे कोणाला धक्का देतात,हे स्पष्ट होणार आहे.लवकरच आघाडीचे वरिष्ठ नेते त्यांना विरार येथे भेटणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

