दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडतील..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,या डिसें. महिन्यात पार पाडण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे,त्यादृष्टीने आयोग कामाला लागला आहे.या निवडणूक होण्याअगोदर बहुचर्चित बिहार राज्याच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणूक ६ व ११ नोव्हे.रोजी होत आहेत.त्याची मतमोजणी १४ नोव्हे.रोजी होणार आहे.बिहारच्या या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत असून या निवडणुकीचे निकाल दूरगामी परिणाम करणारे असतील,त्यामुळे केंद्र सरकार काहीतरी खुसपट काढून आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांचे मनोमिलन व अन्य विरोधी पक्षाची झालेली एकजूट,अशा दोन कारणामुळे सध्या महायुतीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अशा सर्व परिस्थितीमध्ये बिहारचा निकाल आपल्या विरोधात गेला तर त्याचा फटका महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांना बसू शकतो,अशी भिती भाजपला वाटते.भाजपला वाटणारी ही भिती रास्तच आहे.कारण बिहार राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राजद या दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी समोर तगडे आव्हान उभे केले आहे.या राज्यात बिहारी जनतेने जर त्यांना नाकारले तर त्याचे परिणाम व पडसाद महाराष्ट्राच्या शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्कीच उमटतील.
गेल्या काही वर्षात रोजगार व व्यवसायानिमित्त गुजरात,राजस्थान,उत्तर प्रदेश,बिहार व अन्य हिंदी भाषिक राज्यातील लोक राज्याच्या शहरी भागात स्थलांतरीत झाले आहेत.त्यामुळे आजच्या घडीला परप्रांतीयाच्या संख्येचा वेलू गगनावर पोहोचला आहे.आगामी निवडणूकामध्ये या लोकांचे मतदान निर्णायक ठरणारे आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई,ठाणे,नवी मुंबई,वसई – विरार या महानगरात भाजपला भरघोस मतदान झाले होते.त्यामुळे भाजपला वाटणारी भिती ही रास्तच आहे.दुसरीकडे उद्धव व राज या दोघा ठाकरे बंधू यांचे एकत्र येण्यामुळे मराठी भाषिकांची एकगठ्ठा मते या दोघांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे या निवडणुका लवकर होणे,भाजपला परवडणारे नाही.त्यासाठी भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर कशा पडतील,यासाठी प्रयत्न करेल,असे वाटते.
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले असले तरी बिहारचा निकाल विरोधात गेल्यास मोदी व शहा ही जोडगोळी अखेरच्या क्षणी अशाप्रकारची खेळी खेळू शकतात.

