वसंत भोईर,
कातकरी मुलीची घरकाम व मच्छीच्या कामासाठी पिळवणूक,
तालुक्यातील गौरापुर कातकरी वाडी येथील १० वर्षे शालेय वयोगटातील आदिवासी कातकरी मुलीला उत्तन येथे मच्छी वाळवणे आणि घरगुती कामे करण्यासाठी जबरदस्तीने बालमजूर म्हणून राबवण्यात आले,अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मुलीच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे की,आरोपी ज्युलीयाना लेजली पाटील ( रा. उत्तन चौक,भायंदर वेस्ट, ठाणे) हिने मुलीला घरकाम व मच्छी कामासाठी जोरजबरदस्तीने घेऊन गेली व काम न केल्यास शिवीगाळ व मारहाण केली.गेल्या वर्षी गणपती सणापासून ते जून २०२५ पर्यंत मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध घरकामासाठी वापरले गेले,तसेच आगाऊ बयाणा रक्कम कुटूंबियांना देण्यात आली.काल सकाळी आरोपी महिलेने मुलीच्या घरी येऊन मुलीला कामावर घेवून जाण्यास जबरदस्ती केली.
सदर या घटनेची माहिती मिळताच जागेवर श्रमजीवी संघटनेचे जिल्हा महिला प्रमुख रेखा पऱ्हाड,तालुका अध्यक्ष भरत जाधव,सचिव सुरज दळवी कार्यकर्ते आदेश वाघ, नामदेव पवार, नेत्रा मांजे आणि चेतना पवार यांच्यासह पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उपअधिक्षक प्रभा राऊळ पुढील तपास करीत आहेत.

