दीपक मोहिते,
जेव्हा रस्त्यावरील खड्डे बोलू लागतात….
वसई तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा व भलेमोठे खड्डे,यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे.भाजप व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांची उणीदुणी काढत उरावर बसत आहेत,त्यामुळे वसई तालुक्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.मात्र रस्त्यावरील हे खड्डे सुद्धा आता बोलायला लागले आहेत.” आम्हा खड्ड्याचा यामध्ये दोष तो काय ? आम्हाला कोणी जन्माला घातले ? आमचे डांबर कोणी चोरले ? ” खड्डेमय रस्ते,” असे नामकरण कोणी केले ? आमच्या जखमांवर पॅचवर्क करण्याच्या नावावर ओरबाडून खाणारे कोण ? असे एक ना अनेक प्रश्न हे खड्डे आता विचारू लागले आहेत.त्या बिचाऱ्या खड्ड्याना त्यांच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळू शकणार नाहीत.” मड्याच्या टाळूवरील लोणी,” खाणाऱ्याकडून त्याची उत्तरे मिळतील,अशी अपेक्षा देखील या खड्डयाना नाही.

ज्यानी डांबर,खडी,रॅबिट व मुरूम व अन्य साहित्य चोरून आम्हाला वाऱ्यावर सोडले,त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा करायच्या ? वर्षानुवर्षे आम्हाला जन्माला घालून या चोरांनी आपली घरे भरली,आज तेच सारे चोर एकमेकांविरोधात गळे काढत आहेत.खड्डे पुढे म्हणतात,” आमच्यामुळे नव्हे तर या नतद्रष्टांमुळे जनतेला आज अनंत अडचणी सहन कराव्या लागत आहेत,त्याची आम्हाला खंत जरूर आहे.हे चोर आपली घरे भरून थांबली नाही तर आमच्या जीवावर पुन्हा निवडणुका जिंकण्याची स्वप्ने ते आता पाहू लागले आहेत.सत्ताधारी व विरोधक,हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.या दोघांनाही माहीत आहे की त्यांच्या विजयाचा मार्ग हा आमच्या माध्यमातून जातो.त्यासाठी ते आता कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीत आहेत.असो,वसईतील सुजाण जनतेला आमचे एकच सांगणे आहे,आम्हा खड्ड्याना आणि तुम्हा करदात्यांना हे नतद्रष्ट राजकारणी तसेच डांबर चोर हे कायम वेदना देत राहणार आहेत.त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदान करताना ” दगडापेक्षा वीट मऊ,” असा निकष लावत काळजीपूर्वक मतदान करा,

