दीपाली संतोष सोनावणे,
कन्या झाली म्हणून
नको करू हेळसांड,
गोपू बाळाच्या शेजारी
सोनू ताईचा पाट मांड.
लहानपणी ही कविता म्हणताना याचा अर्थ कधी कळला नव्हता.मोठेपणी प्रत्यक्ष अनुभव व आजूबाजूच्या परिस्थितीतून जाणीव झाली की सोनू ताई खरंच नकोशी होती का कोणाला ?
” काय ग ! दोन्ही मुलीच का तुला ?” हा प्रश्न एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला विचारला की कीव येथे अशा बुद्धीभ्रष्ट लोकांची.मुलगा व मुलगी यांच्यामध्ये भेदाभेद त्याकाळीही टळला नव्हता आणि आजही काही प्रमाणात पाहायला मिळतात.
उद्या ८ मार्च जागतिक महिला दिन,मुळात असे दिवस साजरे करण्याची वेळ का येते ? तर महिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी सोसलेल्या वेदनांसाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांनी केलेल्या विशेष कर्तुत्वाचा गौरव करण्यासाठी….
स्त्री जन्म लाभणे,खूप भाग्याचे मानले जाते.विविध पैलू असलेली स्त्री,प्रत्येक नातं जपणारी स्त्री,आई,पत्नी, बहीण,सून व सासू,या अशा विविध भूमिका ठामपणे साकारणारी स्त्री,विविध सामाजिक क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवणारी स्त्री.. एवढे करूनही आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री,या सर्व स्त्रीशक्तींना कोटी कोटी प्रणाम.
दरवर्षी आपण ८ मार्च या दिवशी महिला दिन साजरा करतो.विविध उपक्रम व सोहळे आयोजित करण्यात येतात.पण खरंच स्त्रीला तितके महत्त्व दिले जाते का ?आहे का ती पूर्णपणे सुरक्षित ? तिचा जन्म होण्याआधीच गर्भातच तिला मारले जाते. झाल्यात का या प्रथा बंद ? झालेत का १००% लिंगनिदान करणे बंद ? तर नाही.आपला मागासलेला समाज अजूनही वंशाचा दिवा वाढवण्यासाठी मुलीला या जगात येण्याआधीच मारून टाकत असतो.
ओझे असते ती त्यांच्यासाठी. तिच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी आणि तिचे संगोपन करण्यासाठी लागणारा आर्थिक भार त्यांना सोसत नाही.अशांसाठी सरकार तरी काय आणि किती करेल ? मुलींचे शिक्षण मोफत, सुकन्या योजना,मुलीच्या जन्मानंतर आर्थिक मदत तर सरकार पुरवतच आहे.आर्थिक बोजा,वंश चालवण्याची परंपरा सोडली तर माणुसकी नावाची बाब कुठेतरी हरवते हे जाणवते.मुलगा व मुलगी असा भेद नसावा,मुलीही कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत.विचार बदला व जुन्या प्रथांना बंद करा. मुलगा व मुलगी भेद करण्यापेक्षा माणूस किंवा एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघूया.बाईचा जन्म खूप घाईचा,समस्यांचा आणि संघर्षाचा.कुटुंब व कामाच्या ठिकाणी असणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके व्यस्त असतो की स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळही मिळत नाही जगून घ्यावे मनसोक्त,बागडावे फुलपाखरासारखे असे प्रत्येकीला वाटते.पण वेळ नाही,बघू नंतर या सबबी आपण स्वतःलाच टाळत असतो.ठराविक वयातच काही गोष्टी केलेल्या बऱ्या असतात, एकदा वय निघून गेले की शरीरही साथ देत नाही.आपल्या शरीरामध्ये वयाच्या १२ ते १३ व्या वर्षापासूनच बदल होत असतात.मुले झाल्यानंतर होणाऱ्या बदलांकडे आपण दुर्लक्ष करीत असतो.लहान वाटणारे आजार कधी मोठ्या आजाराचे रूप घेतील,याची खात्री नसते.तोंडाच्या कॅन्सरची लढत असताना मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील या शिक्षिकेने लिहिलेली भावनिक पोस्ट वाचली आणि आपण काय आणि कसे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याकडे कडे दुर्लक्ष करतो,याची जाणीव झाली. शारीरिक क्षमतेपेक्षा अति काम केल्याने ही त्रास होत असतो.घरकाम तसेच कामाच्या ठिकाणी कमी वेळात जास्त काम करण्याच्या हेतूने स्त्रिया झटत असतात. ती क्षमता वेळीच ओळखून सावध व्हायला हवे.याउलट अति आरामही शरीराला तेवढाच घातक असतो. कामाचा आळस करत दिवसा उगीच लोळत पडणे,टीव्ही व मोबाईलमध्ये आपला वेळ वाया घालवणे,सकाळी उशिरा उठणे,या विचित्र सवयी आपल्या आयुष्याला घातक असू शकतात.
महिलांनी स्वतः खंबीर होऊन पायावर उभे राहणे महत्त्वाचे आहे असे वाटते.आपण कोणावरही आर्थिक दृष्ट्या अवलंबून असू नये किंवा कौटुंबिक जबाबदारी पुरुषांचीच आहे,असे न मानता त्यांना हातभार लागेल,हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःला सक्षम बनवावे. कोणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही.यासाठी आर्थिकदृष्ट्या पती व पत्नी यांनी दोघांनीही सक्षम असणे गरजेचे आहे.त्यासाठी योग्य शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाने ज्ञान वाढते, सकारात्मक बदल होतो, वैचारिक पात्रता उंचावते आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतात शिवाय स्वतःच्या पायावर उभे राहून अर्थाजन होते.त्यातही कोणता व्यवसाय निवडावा की नोकरी करावी,हे आपल्या आवडत्या क्षेत्राशी अवलंबून असावे. त्यातून मिळणारा पैसा महत्त्वाचा नसून समाधान महत्त्वाचे असावे.आवडत्या विषयातील करियर असेल तर जीव ओतून काम करण्याची वृत्ती निर्माण होते.
या सोबतच महिलांनी आपल्या अंगी एखादी कला बाळगावी जसे गाणे,चित्रकला,नृत्य, वकृत्व,पाककला,शिवणकाम, मेहंदी,यासारख्या कला अंगीकारल्याने मानसिक स्वास्थ टिकून ठेवून आयुष्य आनंदी होण्यास मदत होते. व्यवहार ज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे,छोट्या छोट्या गोष्टींसाठी कौटुंबिक सदस्य व इतरांवर अवलंबून नसावे,जसे बँकेचे व्यवहार,भाजीपाला, किराणा खरेदी,मुलांचे शाळेचे व क्लासेसचे व्यवहार,ऑनलाईन तिकीट बुकिंग,गुगल मॅप्स,संगणकीय ज्ञान,सामान्यज्ञान अवगत करणे,याकडेही महिला दुर्लक्ष करतात आणि अगदी साध्या कामांसाठी इतरांकडून मदतीची अपेक्षा करतात. त्यामुळे खूप अडचणी निर्माण होऊ शकतात,या अशा अज्ञानामुळे बऱ्याच वेळा महिला विविध फसवणुकीला बळी पडू शकतात.त्यामुळे वेळीच सावध झालेले बरे. मानसिक स्वास्थ्यासाठी कौटुंबिक वातावरण हसते, खेळते असणे गरजेचे आहे.त्यासाठी एकत्रीत कुटुंब पद्धती टिकवून ठेवणे,हे स्त्रीच्या हाती असते.सासु व सुनेचे नाते घट्ट असावे, त्यासाठी एकमेकींचा आदर विचारांचा आदर करावा,मदत करण्याची भावना असावी, एकमेकांच्या सुखदुःखात आणि अडचणीमध्ये खंबीरपणे उभे राहण्याची तयारी असावी.त्यासाठी निस्वार्थ भावनेने एकमेकांवर प्रेम करणे गरजेचे आहे.
” सारे काही माझेच,” ही वृत्ती सोडून ” आपले सारे ” ही भावना असावी.महिलांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे.मग एखाद्याचा स्वभाव, वागणूक बदलवणे व त्याच्याशी जुळवून घेणे, बिलकुल अवघड नाही. कौटुंबिक भांडणे असतील तर त्याचा कळत नकळत परिणाम आपल्या मुलांवर होत असतो.मुले आईकडे बघूनच मोठी होत असतात,जास्त वेळ तीच मुलांच्या सोबत असते म्हणून जसे आपले वागणे तसेच ते घडत असतात.या गोष्टींचे भान राखून आपली वागणूक असावी.शेवटी मुलगी शिकली,प्रगती झाली,या तत्त्वानुसार आई शिकली की पूर्ण घर शिकते व प्रगती करते,घराचं काय स्त्रियांनी देशाला ही प्रगतीपथावर नेले आहे.विविध पदांवर त्या कार्यरत आहेत.लष्कर,नाविक दल,हवाई दल शिक्षण,चित्र,संगणकीय संशोधन,इंजीनियरिंग, वैद्यकीय इ.क्षेत्रांमध्ये त्या अलौकिक कामगिरी करत आहेत.फक्त प्रत्येक स्त्री शारीरिकदृष्ट्या सक्षम होणे अजूनही गरजेचे वाटते जेणेकरून स्वसंरक्षण ती करू शकेल.शिवाजी महाराजांच्या काळात शिकवले जाणारी शिवशस्त्र कला आज शिकवण्याची गरज आहे.स्त्री सुरक्षित असली तर खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल,असे वाटते.

