दीपक मोहिते,
पुन्हा सज्ज,
माजी आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा घेताहेत उत्तुंग भरारी,
विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर काही काळ निवांत असलेले माजी आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत.गेल्या दोन आठवड्यात त्यांनी वरिष्ठ पदाधिकारी,माजी नगरसेवक,नगरसेविका व कार्यकर्त्यांचे सलग विभागवार बैठका घेतल्या.त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.या बैठकाच्या माध्यमातून जी ऊर्जा हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली आहे.त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळतील,असे वाटते.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरक्षण प्रश्नी येत्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.मात्र या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होईल,असे वाटत नाही.जरी झाला तरी त्यावर हरकती-सूचना आदी प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन महिन्याचा अवधी लागणार आहे.त्यामुळे या निवडणुका साधारणपणे ऑक्टो.महिन्याच्या आसपास होतील,असा अंदाज आहे.या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये हितेंद्र ठाकूर हे पक्षबांधणी,
पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या व कार्यकर्त्यांशी थेट संवाद,अशा महत्वाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे समजते.तसेच माजी नगरसेवक व नगरसेविकांचे प्रगती पुस्तकही तपासण्यात येणार आहे.ज्या नगरसेवकांनी महानगरपालिकेचा काळ संपल्यानंतर आपापल्या कार्यालयांना टाळी लावली.तसेच कोरोना काळात जे निष्क्रिय राहिले,त्यांना यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.आ.ठाकूर यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले मुकेश सावे पुन्हा सक्रिय झाले असून ते आता पक्षाच्या दैनंदिन कामकाजातही लक्ष घालू लागले आहेत.फिनिक्स पक्षी जसा राखेतून भरारी घेतो,तशीच भरारी घेण्याच्या तयारीत हितेंद्र ठाकूर आहेत.कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महानगरपालिका जिंकायचीच आहॆ,असे आवाहन केल्यानंतर वातावरणात चांगलाच बदल झालेला पाहायला मिळत आहॆ.गेल्या काही दिवसात पक्षात प्रवेश करण्यासाठी विवा महाविद्यालयात असलेल्या पक्षाच्या मुख्यालयात होणारी तरुणांची गर्दी खूप काही सांगून जाते.

