दीपक मोहिते,
” आम्हा मतदारांची सनद,”
१ ) शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालये महानगरपालिकेकडे कधी हस्तांतरीत होणार ? हस्तातरण प्रक्रियेत कोणत्या अडचणी आहेत.
२ ) महानगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याची डागडुजी,दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा मुहूर्त कधी ? वर्षानुवर्षे अशीच लूट होत राहणार का ?
३ ) शहरातील करदात्यांना दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवा कधी उपलब्ध होणार ? ” आपला दवाखाना,” योजनेची सद्यस्थिती पाहता,ही व्यवस्था फार काळ चालणार नाही,असे करदात्यांना वाटते ? त्यामध्ये किती तथ्य आहे ?
४ ) शहरातील पाच उड्डाणपूल व रिंगरुट रखडण्यामागची नक्की कारणे काय होती ? महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले होते,पण त्यासंदर्भात आवश्यक असलेला प्रस्ताव का पाठवला गेला नाही.
५ ) लघुपाटबंधारे विभागाच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती,पण योजना तसूभरही पुढे सरकल्या नाहीत,यामागची कारणे काय ? व त्या निधीचे पुढे काय झाले ?
६ ) ” भूमिगत वीजवाहिन्या, ” या कळीच्या मुद्द्याचे काय झाले ? मतदारांना फसवण्याचे पाप नक्की कोणी केले ?
७ ) अंतर्गत रस्ते वारंवार का फुटतात ? डांबर चोरणारे कोण ? त्यांना कोणाचे संरक्षण आहे ?
८ ) नालेसफाई न करता ठेकेदार आपली बिले कशी काढतात ? अशी बिले काढणाऱ्या अलीबाबा आणि ४० चोरांच्या टोळीत कोणकोण आहेत.सध्या अलीबाबा इडीच्या कोठडीतून बाहेर आला आहे.इतर ४० चोर कधी आत जाणार ?
९ ) बाजार कर व कचरा उचलणे,ठेकेदारांच्या बँक खात्याची चौकशी कधी होणार ?
१० ) रस्त्याचे खड्डे बुजवणे व पॅचवर्कचे टेंडर्स कोणाला दिली जातात व करदात्याच्या किती पैश्याची दरवर्षी उधळपट्टी होत असते..
११ ) बेनामी नावाने ठेके घेणारे लोकप्रतिनिधी कोण ? हे आम्हा करदात्यांना कळले पाहिजे,कारण तो आमचा अधिकार आहे..

