दीपक मोहिते,
समर्थनचे डॉ.अशोक येंडे व प्रा. जयश्री येंडे लवकरच व्हिएतनामच्या दौऱ्यावर,
हनोई,व्हिएतनाम येथे सायबर गुन्ह्यांवरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी विवेक पंडित यांच्या ” समर्थन,” संस्थेचे अध्यक्ष अॅड. ( डॉ. ) अशोक येंडे आणि प्रा. ( डॉ. ) जयश्री येंडे यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक लढाईत अभिमानाची बाब ठरलेली ऐतिहासिक घटना,सायबर convention – अॅड. ( डॉ. ) अशोक येंडे आणि प्राचार्या ( डॉ. ) जयश्री येंडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर गुन्ह्यांवरील करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक समारंभ २५ आणि २६ ऑक्टो.२०२५ रोजी हनोई ( व्हिएतनाम ) येथे पार पडणार आहे.
अॅड. ( डॉ. ) अशोक येंडे हे ” समर्थन’, ” संस्थेचे अध्यक्ष आहेत,जी संस्था विवेक पंडित यांनी स्थापन केली आहे.
२४ डिसेंबर २०२४ रोजी स्विकारण्यात आलेला हा करार सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध,तपासणी आणि खटल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी जगातील पहिला सर्वसमावेशक जागतिक करार आहे.या ऐतिहासिक समारंभात सुमारे १०० देशांतील राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान,उपपंतप्रधान, परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र सचिव उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम व्हिएतनाम सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.समारंभाच्या उद्घाटन सत्रात व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष महामहिम लूँग कुआंग आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस महामहिम अँटोनियो गुटेरेस प्रमुख यांची भाषणे होणार आहेत.
याविषयी आपली भावना व्यक्त करताना अॅड. ( डॉ. ) अशोक येंडे म्हणाले, “ सायबर जग अधिक सुरक्षित करण्याच्या या ऐतिहासिक जागतिक प्रयत्नांचा भाग होणे,ही आमच्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. हा करार विश्वास,सामायिक जबाबदारी आणि समन्वित आंतरराष्ट्रीय कृतीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”
ते पुढे म्हणाले, “ सायबर गुन्ह्यांविरुद्धची लढाई ही केवळ कायदेशीर किंवा तांत्रिक बाब नसून ती सामूहिक जागतिक जबाबदारी आहे.हा करार अधिक मजबूत सहकार्य,क्षमता-वृद्धी आणि डिजिटल युगातील अधिकारांचे संरक्षण यासाठी मार्ग प्रशस्त करतो.”
त्यांचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभाग भारतीय कायदेविषयक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.सायबर कायदा,न्याय आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची ही जागतिक पातळीवरील दखल आहे.

