वसंत भोईर, वाडा
दिवसभर काम,पण मिळेना पगार…किती दिवस बिनपगारी राबणार ?
ग्रामपंचायत स्तरावर महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन थकीत राहिल्याने सेवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने जरी मासिक आठ हजार रु.मानधन व दोन हजार रु.प्रवास व प्रोत्साहन भत्ता जाहीर केला असला,तरी प्रत्यक्षात अनेकांना हे मानधन अद्याप मिळालेले नाही. परिणामी,ग्रामरोजगार सेवक बिनपगारी काम करीत आहेत.
ग्रामरोजगार सेवक हे ग्रामपंचायतीचे समन्वयक म्हणून काम करतात.वैयक्तिक लाभाच्या योजनापासून ते सार्वजनिक कामांच्या लेखाजोख्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. हे अर्धवेळ काम असले तरी प्रत्यक्षात त्यांना दिवसभर पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागते. दरम्यान,महिनो महिने मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.रोजगार सेवक मानधनवाढीकडे लक्ष लावून आहेत.
या पदाला अर्धवेळ मानले जात असले तरी प्रत्यक्षात ग्राम रोजगार सेवकांना सकाळपासून संध्या कालपर्यंत ग्रामपंचायत हजेरी लावावी लागते.कागदपत्रांची पूर्तता,अर्जाची छाननी आणि योजनांचा ताण,यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस या कामात जातो.
आठ ते दहा तास आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम करतो. योजना राबवण्यापासून ते लेखाजोखा सादर करण्यापर्यंतची जबाबदारी आमच्यावर असते.मात्र एवढे काम करूनही पगार वेळेवर मिळत नाही.थकीत मानधन तातडीने द्यावे आणि आम्हाला कायम सेवेत घ्यावे अशा या ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या आहेत.

