वाडा प्रतिनिधी,
वाड्यातील नागरिकांची स्वदेशी पणत्यांना पहिली पसंती
दिवाळी हा सण गेल्या सोम.पासून सुरु झाला आहे.दिवाळीच्या सणात पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून दिवाळी हा सण प्रकाशाचा व तेजाचा सण समजला जातो. प्रथा-परंपरेनुसार वसूबारस ते भाऊबीजेपर्य॔त दिवाळी सण साजरा होत असतो.या दरम्यान प्रत्येक घरात पणत्या लावून आवर्जून रोषणाई केली जाते.दिवाळी सणानिमित्ताने कुडूस बाजारपेठेत पणत्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या असून नागरिकांनी खरेदी करत असतांना स्वदेशी पणत्यांनाच पसंती दिली आहे.
सध्याच्या युगात वीजेवर चालणारी इतकी साधने असतांनाही दिवाळीत आपण पणत्या आवर्जून लावत असतो.कारण विजेच्या दिव्यात आपल्या तेजाने दुस-या दिव्याला प्रकाशित करण्याची शक्ती नाही.जी सामान्य पणतीच्या ज्योतीत आहे.एका पणतीची ज्योत हव्या तितक्या इतर पणत्यांना प्रकाशित करु शकते.ज्योतीने ज्योत पेटवण्याचा उत्सव म्हणजे दीपावली होय.पणती स्वतः तेजाने प्रकाशित होतेच, पण ती इतरांनाही त्याच तेजाने प्रकाशित करते. दीपावली सणात पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असल्यामुळे
नागरिकांनी चायनीज पणत्यांना दूर सारत स्वदेशी पणत्यांना मोठी पसंती दिली आहे.

