जव्हार प्रतिनिधी,
दिवाळी फराळ व घरगुती साहित्य विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
जव्हार तालुक्यातील ग्रामीण महिला स्वावलंबनाचा सुगंध पसरवत आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) आणि पंचायत समिती जव्हार तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांनी पंचायत समिती आवारात आकर्षक ” दिवाळी महोत्सव स्टॉल प्रदर्शन,” भरवले आहे.या ठिकाणी जव्हार तालुक्यातील एकूण १० महिला बचत गट सहभागी झाले असून,पारंपरिक दिवाळी फराळ,बांबू,आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या,सुगंधित अगरबत्ती,रांगोळी,झाडू, साड्या,तोरण अशा अनेक घरगुती व उपयुक्त वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.या सर्व वस्तू महिलांनी घरगुती पद्धतीने प्रेमाने तयार केल्या असून,त्यांच्या दर्जेदार व पारंपरिक स्वादामुळे ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,जव्हार यांच्यावतीने सर्व विभाग प्रमुख,सन्मा.अधिकारी व कर्मचारीवृंदांना विनंती करण्यात आली आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित या ‘ दिवाळी महोत्सवा,’ ला जरूर भेट द्या, स्थानिक महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करा आणि त्यांच्या स्वावलंबनाला हातभार लावा.तुमच्या छोट्या पाठिंब्याने त्यांच्या दिवाळीत नवचैतन्याची झळाळी येईल.”
सदर प्रदर्शनास पंचायत समिती जव्हार प्रशासक तथा गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांनी स्वतः भेट देऊन स्टॉलवरील वस्तूंची खरेदी केली.तसेच अधिकारी वर्ग,विभाग प्रमुख व कर्मचारी यांनाही वस्तू खरेदी करून महिला बचत गटांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आवाहन केले.
सदर उपक्रमात सहभागी झालेले महिला बचत गट पुढीलप्रमाणे :
वाळवंडा वनमाला महिला उत्पादक गट,
हाडे उज्वला महिला बचत गट,
गरदवाडी संजीवनी महिला बचत गट,
झाप कीर्ती महिला उत्पादक गट,
कोरतड मोगरा महिला उत्पादक गट,
रमाबाई महिला बचत गट, (न्याहाळे खुर्द)
गुलाब महिला उत्पादक गट, (आळेचीमेट)
जय शिवाजी महिला बचत गट, (वडोली)
निसर्ग महिला उत्पादक गट, (कुतूरविहीर)
अमृता महिला उत्पादक गट, (धानोशी)
या महिलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीतून स्वावलंबनाचा मार्ग शोधला असून, “ हातात कला, मनात उमेद,” या घोषवाक्याने त्यांचा दिवाळी महोत्सव उजळून निघाला आहे.

