दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
महायुती सर्वच्या सर्व जागा जिंकणार,
विधान परिषदेच्या १७ जागासाठी २२ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीचे जागावाटप पूर्ण झाले असून महायुतीमधील भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट ) या तीन प्रमुख पक्षांनी एकेक पाऊल मागे घेत ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. भाजप – ११,शिवसेना ( शिंदे गट ) – ०४ व राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प. गट ) – ०२ ,असे जागावाटप झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सात जागा मिळाल्या हव्या, अशी मागणी करत दिल्ली गाठली होती. पण गृहमंत्री अमित शहा यांनी धुर्तपणे चर्चेचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोलवला. दुसरीकडे फडणवीस यांनी जागावाटपासंदर्भात जी काही चर्चा होईल, ती मुंबईतच होईल,असे स्पष्ट करत शिंदेंना धोबीपछाड दिला. त्यानंतर काल हे जागावाटप मुंबईत मार्गी लागले. रत्नागिरी – रायगड या जागेवर शिंदे गटाने तर ठाणे – पालघरवर भाजपने दावा केला होता. पण तहाच्या चर्चेत या दोन्ही पक्षाना माघार घ्यावी लागली.रत्नागिरी – रायगड येथे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे तर ठाणे – पालघर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी रविंद्र फाटक हे निवडणूक लढवत आहेत.
ठाणे – पालघर मतदारसंघात एकूण १ हजार ३५ मते आहेत, त्यामध्ये भाजप – ४४४, शिवसेना ( शिंदे गट ) – ३४६ तर इतर – २४५ असे बलाबल आहे. इतर मध्ये बहुजन विकास आघाडी – ७१, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ४७, राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प. गट ) – ३८, राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प. गट ) – २९, शिवसेना ( उबाठा ) – १८, मनसे – ०६, समाजवादी पक्ष – ०६, मार्क्स कम्यु.- ०६, एमआयएम – ०५, कोणार्क विकास आघाडी – ०४, भिवंडी विकास आघाडी – ०३, वंचित बहुजन आघाडी – ०२, साई पक्ष – ०१ व अपक्ष – ०९ यांचा समावेश आहे.
राज्यातील एकूण राजकीय चित्र पाहता महायुती १७ पैकी १७ जागा जिंकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

