दीपक मोहिते,
वेळीच सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ…
आज जागतिक पर्यावरण दिन, जगभरात हा दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.काही वर्षांपूर्वी विकासाच्या नावाखाली वसुंधराचे अपरिमित हानी होत असल्याचे दिसून आल्यामुळे सन् १९७२ साली स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे याविषयी एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्यावरणप्रेमी मान्यवरांनी केलेला हा प्रयत्न स्तुत्य असला तरी गेल्या ५४ वर्षात या महत्वाच्या विषयी किती काम झाले ? याचा लेखा-जोगा मांडणे मला गरजेचे वाटले, म्हणून हा लेख प्रपंच करत आहे.

तप्त वातावरण,भुगर्भातील पाण्याची पातळी सतत खालावणे, अवेळी पाऊस पडणे, तप्त वातावरणामुळे जलसाठ्यातील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होणे, असे प्रकार अलीकडच्या काळात वाढीला लागले आहेत. वास्तविक या परिषदेने केवळ दिन साजरा करण्याऐवजी या महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. मात्र त्यादृष्टीने प्रयत्नच झाले नाहीत. वनसंपदेची होत असलेली प्रचंड हानी, समुद्रावर होणारे अतिक्रमण, प्रदूषण, सागरी किनारी मातीभराव करुन बॅक बे उभारणे, वृक्षलागवड आदी संकल्पना राबवण्यात संबंधित विभागाना आलेले अपयश व पर्यावरणाबाबत लोकामध्ये जनजागृती करण्यासंदर्भात शासकीय स्तरावरील उदासीनता इ.महत्वाच्या बाबीकडे गेल्या ५४ वर्षात दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे सीमेंट-कॉंक्रीटच्या जंगलात वनसंपदा लुप्त झाली. वृक्षकत्तलीमुळे भुगर्भातील पाण्याचे साठे कोरडे पडले व पिण्याच्या पाण्यासाठी जंगलातील वाघ, बिबटे आता नागरी वसाहतीमध्ये उतरु लागले आहेत. झाडांची मुळे भुगर्भातील पाणी घट्टपणे पकडून ठेवत असतात. त्यामुळे जंगलातील जल साठ्यामध्ये पूर्वी भरपूर पाणी असायचे, परंतु आता ही प्रक्रियाच मोडीत निघाली आहे. म्हणून केवळ एक दिवस साजरा करुन चालणार नाही, तर पर्यावरण/वसुंधरा वाचवा,लोकचळवळ होणे गरजेचे आहे. याविषयी शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सार्वजनिक स्थळ व अन्य स्तरावरून प्रयत्न झाले पाहिजेत.

