दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अन्यायाविरोधात तरुणांनी पेटून उठायला हवे,
राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्याला काडीची किंमत नसते, अशी चर्चा सतत होत असते. त्यांची गरज केवळ सतरंज्या उचलणे, नेते मंडळींची खरकटी व उष्टी उचलणे या कामासाठी असते. हे आपण सतत अनुभवत असतो. निवडणूकीसाठी उमेदवारी देणे किंवा लाभाचे पद देताना मंत्री, खासदार, आमदार व पक्षाचे वरिष्ठ नेते यांची मुले, नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात येत असते. वर्षानुवर्षे हे असेच चालत आल्यामुळे पक्षात डावलल्या गेलेल्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली आहे.
ते आपल्या पोस्टमध्ये काय म्हणतात ते पहा, त्यांच्या पोस्टचे शीर्षक आहे,
” कार्यकर्त्यांनी करायचं काय ?”
स्थानिक स्वराज्य संस्थामधून आमदारकीची निवडणूक घोषित झाली आहे. बहुतेक पक्षांमध्ये मंत्र्याचा, खासदाराचा, आमदाराचा मुलगा किंवा नातेवाईक यांची नावे किंवा अनेक वर्षे आमदारकी भोगलेल्यांची नांवे पुढे येत आहेत. तसेच बाहेरून आलेल्याना
उमेदवारी देण्यात येत आहेत.अशावेळी कार्यकर्त्यांनी करायचं काय ?
असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या या म्हणण्यात तथ्य आहे. कारण हल्ली आपल्या देशात व महाराष्ट्रात हेच चालले आहे. आमदारांची मुले, पत्नी, मेव्हणी किंवा मित्र,याना पक्षाची तिकिटे मिळत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याना या प्रक्रियेत कुत्रं देखील विचारत नाही. भाजपसारख्या पक्षात केशव उपाध्ये व माधव भंडारी सारखे पदाधिकारी गेली अनेक वर्षे आपल्याला संधी मिळेल,अशा आशेवर पक्षात निष्ठेने काम करत आहेत.” आपल्यानंतर आपले नातेवाईक किंवा बागलबच्चे,” हे सूत्र जवळपास सर्वच पक्षांनी स्विकारल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खाणारे पदाधिकारी व कार्यकर्ते आजही पक्षात सतरंज्या उचलण्याची कामे करत आहेत.” आपण व आपल्यानंतर आमची
मुलबाळे,” अशा बुरसट मानसिकतेमुळे अनेक नेत्यांची घरे देखील दुभंगली गेली. सत्ता व पक्षीय राजकारणात आपला कायम दबदबा रहावा, यासाठी पक्ष कार्यकर्त्याना कायम दाबले जाते. पण आता कायम उपेक्षित राहण्याऐवजी पक्षातील तरुणांनी या गैरप्रकाराविरोधात पेटून उठायला हवे. ब्रिटिशांना जसा सत्तेचा माज होता, तसाच हा माज आहे.भारतीयांनी स्वातंत्र्य लढा पुकारून जसा ब्रिटिशांचा माज उतरवला होता तशाच पद्धतीने तरुणांनी आता पक्षांतर्गत बंड करून नेत्यांचा माज उतरवला पाहिजे.

