दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
रविंद्र फाटक यांना वसईत पैकीच्या पैकी मतदान होऊ शकते,
ठाणे – पालघर विधान परिषद जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली व ती आपल्या पदरात पाडून घेतली. पालघर व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात ” आपणच दादा आहोत,” हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
आपले पारंपारिक राजकीय शत्रू असलेले वनमंत्री गणेश नाईक व ठाण्याचे आ. संजय केळकर या दोघांचे त्यांच्यासमोर मात्रा न चालल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यावर त्यांचे निर्विवाद राजकीय वर्चस्व निर्माण झाले आहे. तरीही त्यांना बेसावध राहून चालणार नाही.पालघर,बोईसर या दोन तालुक्यात त्यांच्या पक्षाची चांगली बांधणी आहे. मात्र वसई तालुका,तलासरी,
विक्रमगड या तालुक्यात त्यांचा पक्ष बाळस धरू शकला नाही. वसई तालुक्यात त्यांच्या पक्षाकडे समर्थ नेतृत्व नाही. त्याचे परिणाम गेल्या वर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला भोगावे लागले होते. दुसरीकडे भाजपने पहिल्याच प्रयत्नात चांगली मुसंडी मारल्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या गटाला त्या निवडणुकीत चांगलाच हादरा बसला.आजच्या घडीला शिंदे यांच्या पक्षाकडे प्रभावी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा दुष्काळ आहे.
जनमानसावर प्रभाव टाकू शकेल,असा चेहरा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे अक्षरशः पानिपत झाले. विधान परिषदेच्या या निवडणुकीत रविंद्र फाटक याना बहुजन विकास आघाडी व भाजप या दोघांची मदत होणार आहे. त्यामुळे फाटक चांगले मताधिक्य घेऊन निवडून येतील.येथे बविआ – ७१,भाजप – ४४ असे ११५ नगरसेवकांचे एकगठ्ठा मतदान त्यांना होऊ शकते. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकूर व शिंदे जुने वैर विसरून एकत्र आले आहेत. पण या मैत्रीचा शिंदे यांना राजकारणात फायदा होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. कारण हितेंद्र ठाकुर हे निवडणुकीपुरते मैत्रीचा हात पुढे करत असतात. आपला पक्ष दुसऱ्याच्या दावणीला ते कधीही बांधत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे.

