दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली,
ठाणे – पालघर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक हे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा अंदाज होता. पण त्यांची निवड बिनविरोध होईल,असे कोणालाही वाटले नव्हते. शिवसेनेला ही जागा मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असेच होते.त्यांनी वनमंत्री गणेश नाईक व भाजपचे आ. संजय केळकर या दोघांना धोबीपछाड देत,ही जागा आपल्या पदरात पाडली. या सर्व घडामोडीनंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिंदे यांनी आपली राजकीय ताकद जी पणाला लावली ती नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्यात अनेक वावड्या उठल्या व अफवांचे अमाप पीक आले होते. त्यामध्ये अनेक युट्युब चॅनेलवाल्यानी आपला खारीचा वाटा उचलला होता. पण शिंदे यांनी या अफवाना भीक न घालता शांतपणे आपले उद्दिष्ट साध्य केले.
एकनाथ शिंदे हे फोडाफोडी, राजकीय नेत्यांना आपलेसे करणे, या कामात अत्यंत तरबेज तर आहेतच पण त्यांच्यामध्ये असलेला धुर्तपणाही वाखाणण्याजोगा आहे. पालघर,बोईसर व डहाणू तालुक्यात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी विरोधकांना आपली ताकद दाखवली. पण वसई तालुक्यात मात्र त्यांना मतदारांनी कधीच थारा दिला नाही. त्यामुळे त्यांनी आता वसई तालुक्यात बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण त्यांचे हे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतील, हे सांगणे या घडीला शक्य नाही.कारण,ज्या पक्षाशी त्यांनी चुंबाचुंबी सुरू केली आहे, तो पक्ष वसईत आपली सत्ता अबाधित राहावी, यासाठी कायम सजग असतो. पण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभव व महानगरपालिका निवडणुकीत झालेली प्रचंड पीछेहाट अशा दोन कारणामुळे तसेच वसई तालुक्यात पक्षाला उंचीवर नेऊन ठेवणारे नेतृत्व त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना आता कुबड्या घेण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे अधूनमधून गळाभेटी होऊ लागल्या आहेत. त्यांचे हे मनोमिलन त्यांना वसईच्या राजकारणात पुढे नेणारे ठरते की भाजपच्या झंझावातापुढे पीछेहाट करणारे ठरते, हे येणाऱ्या काळात वसईकराना पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडे ७९० तर महाविकास आघाडीकडे केवळ १३० मते होती.त्यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव अटळ होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व रविंद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

