दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
डोनाल्ड ट्रम्प ;… तर असा मित्र नसलेलाच बरा,
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलेल्या एका वक्तव्याने त्यांनी एकतर ताळतंत्र सोडले आहे किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असावी,असे वाटू लागले आहे. ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून भारताला कमी लेखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
काल त्यांनी ” भारताने गेली अनेक दशके अमेरिकेला लुटले असून भारतीय मालावर भरमसाठ शुल्क लावण्याच्या आपल्या निर्णयावर आपण आजही ठाम असल्याचे सांगितले.” हे सांगत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी मला खूप आवडतात व ते माझे चांगले मित्र आहेत, हे देखील सांगायला विसरत नाहीत.त्यांचे हे वागणे पोटात एक आणि ओठावर दुसरेच असे आहे. भारत – पाक युद्धात त्यांनी ” मी भारताला युद्ध थांबवण्याचे आदेश दिले,” असे वक्तव्य जवळपास दहा ते पंधरा वेळा केले. त्यामुळे जगभरात आपल्या देशाची नाचक्की झाली. अमेरिका व इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास त्यांनी मनाई केली.भारतावर बंधने लादणारे तुम्ही कोण ? असा प्रश्न मोदी यांनी त्यांना विचारायला हवा होता किंवा भारताने ट्रम्प यांच्या दमदाटीला भीक न घालता रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवायला होती. पण आपली ५६ इंचाची छाती फुगली नाही ती अधिक आकुंचित झाली. भारतीयांना हाथकड्या घालून भारतात परत पाठवणारे ट्रम्प हे स्वतःला मोदी यांचे कितीही मित्र म्हणवून घेत असले तरी त्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. आपल्या विरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानच्या आयएसआय या पाताळयंत्री गुप्तहेर संघटनेला किती डोक्यावर घेऊन नाचत आहेत, ते उभ्या जगाने पाहिले. त्यांचे पंतप्रधान शाहाब शरीफ व फिल्डमार्शल असीम मुनीर हे दोघेही सध्या ट्रम्प यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्याच ट्रम्पना दुसऱ्यांदा निवडणूक जिंकता यावी, म्हणून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या प्रचारात ” अबकी बार ट्रम्प सरकार,” असे कोकलत फिरत होते.त्याच ट्रम्पच्या धमकीमुळे आज आपल्या सरकारने रशियाकडून तेल खरेदी बंद करणे बंद केले. त्यामुळे देशात महागाई, इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, रुपयाची घसरण सुरू झाली आहे, सोने विक्रीला काढावे लागले आहे व परकीय चलनाचा साठा सतत कमी होत आहे. हे सारे दुष्टचक्र लक्षात घेता आपले परराष्ट्र धोरण,अर्थकारण व व्यापार या तीन्हींची प्रचंड पीछेहाट सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जीडीपी वाढल्याचा कितीही दावा करत असले तरी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा नवे आर्थिक धोरण का आखत आहेत. तसेच माजी गव्हर्नर रघुराम राजन सध्याच्या आर्थिक परीस्थितीवर वारंवार इशारे का देत आहेत. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी,परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. भारत व अमेरिका या दोन देशातील आर्थिक व्यवहार व व्यापार, या दोन क्षेत्रात मोदी – ट्रम्प यांच्यामधील मैत्री, हा क्रायटेरिया होऊच शकत नाही, हे आपल्या सरकारने लक्षात घ्यायला हवे.ट्रम्प व मोदी यांच्यामध्ये असलेली मैत्री जर देशाला रसातळाला नेणारी असेल आपल्याला असा मित्र मुळीच नको…

