दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कार्यकर्त्यांची ओळख ; पूर्वी ” पायपुसणी,” अशी होती, ती आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यांच्या ( घराणेशाही ) प्रथेमुळे आजवर अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आला. या विषयावर अनेक विचारवंतांनी आजवर खूप लिहिले, पण परिस्थितीत कोणताही बदल होऊ शकला नाही. विविध पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षात सतरंज्या उचलण्याचे काम करत आहेत. अशा या कार्यकर्त्यांचा पक्षात ” अंधभक्त,” म्हणूनच वावर होत असतो. याला आज एकही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकला नाही.जवळपास सर्वच पक्षात कार्यकर्त्यांवर असे बलात्कार होत असतात.
शरद पवार,अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, इंदिरा गांधी, ममता बॅनर्जी, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे,वसंतदादा पाटील,बॅ.अंतुले,नारायण राणे व अन्य काही
घराण्यांनी ही वाईट प्रथा कायम जोपासली. यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत तटकरे यांच्या घरात खासदार,मंत्री व आता बिनविरोध म्हणून निवडून आलेला मुलगा तसेच ठाकरे कुटुंबात देखील हे असेच चालू आहे. सुप्रिया सुळे यांचे व्याही देखील आता आमदार झाले आहेत. त्यांना उमेदवारी मिळवून देणे व बिनविरोध निवडून आणण्यात एका बड्या उद्योगपतीने विशेष कामगिरी बजावली. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये नातेवाईकांचा झालेला भरणा, दोन्ही यादव कुटुंबे व नितीशकुमार यांना पायउतार होण्यास कारणीभूत ठरले तर प. बंगालमध्येही तेच घडले. आपल्या महाराष्ट्रात तर ” आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्ट्या,” असे सुत्रच अवलंबण्यात आले आहे. सत्तेच्या राजकारणात आपल्या नातेवाईकांची वर्णी लावण्यात आपले राज्य व राजकीय नेते आजच्या घडीला अव्वल क्रमांकावर आहेत. कार्यकर्त्यांच्या मताला किंमत न देणारे नेते उच्चपदावर असले की असेच होत असते. पक्षात पूर्वी हे कार्यकर्ते ” पायपुसणी,” म्हणून ओळखले जात असत, आता त्यांचे ” अंधभक्त,” असे गोंडस नामकरण झाले आहे. हे कार्यकर्ते जोवर अशा गैरप्रकाराच्या विरोधात उभे ठाकणार नाहीत. तोवर त्यांना कायम सतरंज्या उचलत राहाव्या लागणार आहेत. कदाचित बदलत्या काळात त्या धुवून सुकत घालण्याची पाळी त्यांच्यावर येणार आहे.

