तलासरी प्रतिनिधी,
विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावावी – प्रा.डॉ.राजपूत,
आदिवासी प्रगती मंडळ संचालित,कॉ.गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ग्रंथालय व माहितीशास्र विभागाअंतर्गत, भारतरत्न माजी राष्ट्रपती.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ” वाचन प्रेरणा दिन, ” म्हणून साजरा करण्यात आला.
विद्यार्थी व समाजाच्या इतर घटकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,त्यांना प्रेरणा मिळावी व वाचनाचे महत्व कळावे,या हेतूने दरवर्षी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.त्यासाठी आज येथे या वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत यांनी आपल्या मनोगतात अतिशय प्रतिकूल परीस्थितीत स्वप्नांचा पाठलाग करत ध्येय कसे गाठावे,यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होय.त्यांनी यावेळी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श पुढे ठेवून जीवन जगावे,वाचनाचा माणसाच्या व्यक्तिमत्व विकासावर कसा परिणाम होतो,वाचनाचे विविध पैलू आणि काय वाचावे याचे अमूल्य मार्गदर्शन केले.स्वप्न मोठी पहा,या अब्दुल कलामांच्या विधानाची त्यांनी विद्यार्थ्यांना आठवण करून दिली आणि आजपासून वाचन करू,असा संकल्प विद्यार्थ्यांकडून वदवून घेतला.वाचनाची सवय आपल्याला आत्मनिर्भर, विवेकी व जबाबदार बनवते म्हणून विद्यार्थ्यांनी सवय लावून घेतली पाहिजे असेही मार्गदर्शन प्राचार्यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी डॉ.अर्जुन होन यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रावर आधारित व त्यांनी प्रतिपादित केलेल्या यशस्वीतेच्या दहा नियमांच्यासह 3 चित्रफीती तयार करून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या. तसेच प्रथम वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांना गोदावरी वार्षिक अंकाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.ए.राजपूत, उपप्राचार्य डॉ.आर.एन,पवार,प्रा.भास्कर गोतीस,प्रा.वंदना सावे,प्रा. रंजना शनवार प्रा.प्रियंका शनवार इ. प्राध्यापकासह प्रथम वर्ष कला शाखेचे दोनशे हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

