दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आयाराम गयारामाचे आवागमन तूर्तास थंडावले आहे…
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सुरू झालेले इनकमिंग सध्या काही अंशी थंडावले आहे.ज्या पद्धतीने इनकमिंग सुरू झाले होते,त्यामुळे जुन्याजाणते भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे,परिणामी ही मोहीम सध्या आवरती घेण्यात आल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया सुरू झाली होती.त्यास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला होता.पण,नव्याने दाखल झालेल्या आयारामामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही,याविषयी भिती निर्माण झाली आहे.बाहेरून येणाऱ्यांचा ओघ असाच सुरू राहीला तर आपले राजकीय भवितव्य अंधारात सापडेल,अशा विवंचनेत अनेक इच्छुक उमेदवार सापडले आहेत.निवडणुकीच्या तोंडावर जुने – नवे असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता गृहीत धरून ही प्रक्रिया सध्या थंडावली आहे.सध्या सुरू असलेली खोगीर भरती ही कालांतराने पक्षाला डोकेदुखी ठरू शकते,हे उमगल्यानंतर वरिष्ठांनी आता थोडेसे आवरते घेतले आहे.ज्या इच्छुकांना आपल्या मूळ पक्षाची उमेदवारी मिळणार नाही,ते बंडखोर होऊन भाजपच्या उंबरठ्यावर येतील,अशी भिती भाजपमध्ये सध्या वाढली आहे.पक्ष अडचणीत असताना ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खस्ता खात पक्षाला साथ दिली,त्यांना उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवले गेले,तर निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो,अशी शक्यता जाणवू लागल्यानंतर भाजपने सध्या आवरते घेण्यास सुरुवात केली आहे.

