दीपक मोहिते,
कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार,
काल कॉक्रोच जनता पार्टीचे ( सीजेपी ) अध्यक्ष अभिजित दिपके हे दिल्लीत आल्यानंतर जंतर-मंतरवर हजारो तरुणांनी केलेली गर्दी व आंदोलनाला जनतेचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेता येणाऱ्या काळात या ठिणगीचा चांगलाच भडका उडण्याची शक्यता आहे. काल झालेल्या या आंदोलनानंतर दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. अभिजित दिपके यांनी सुरु केलेल्या या लढ्यात त्याच्या पक्षाला सरकार व मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे. जंतर मंतरवर झालेले हे आंदोलन प्रचंड यशस्वी झाले. पण एकाही वृत्तवाहिनीने त्याचे थेट प्रक्षेपण दाखवणे टाळले. सोशल मिडियावर मात्र या घटनेच्या बातम्या व फोटोचा अक्षरशः पाऊस पडला. त्यामुळे या पक्षाला आगामी काळात केंद्र सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाडीचा सामना करावा लागणार आहे.
या आंदोलनानंतर आपली गोदी मिडिया चांगलीच सक्रिय झाली असून त्यांनी आता सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी ते सीजेपीलाच प्रश्न विचारू लागले आहेत. नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी हे आंदोलन झाले.
काल सकाळी अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत आले. विमानतळावर उतरताच त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा. कारण नीट परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी पेपरफुटीमुळे आत्महत्या केल्या. त्यांच्या या आत्महत्येला ते जबाबदार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अभिजित दिपके यांनी दिल्ली गाठली. या आंदोलनाला दिल्ली पोलिस परवानगी देणार नाहीत, असे वाटले होते.पण परवानगी दिली नाही तर हे वादळ देशभरात फोफावेल, अशा भितीमुळे दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीला जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली.
जंतर-मंतरवर पोहोचल्यावर अभिजित दिपके यांना गोदी मीडियाच्या पत्रकारांनी त्यांना विचारले की सोशल मीडियावर पेज चालवून काय होणार. त्यावर अभिजित दिपके म्हणाले, कॅमेरा फिरवून लोकांना दाखवा की, किती कॉक्रोच घरातून बाहेर पडून जंतर-मंतरवर आले आहेत ते.” तसेच येत्या दोन ते तीन दिवसात आमच्यासोबत लाखो विद्यार्थी असतील. कॉक्रोच जनता पार्टी हा काही ठरवून काढलेला पक्ष नाही. सरकारवर नाराज असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा हा आवाज आहे.
या सरकारने गेल्या बारा वर्षांपासून आम्हाला हिंदू-मुस्लीम राजकारणात अडकवून ठेवलं. त्यामुळे कोणाचा फायदा झाला ? हिंदू-मुस्लीम केल्यामुळे देशातील एकाला तरी नोकरी मिळाली का ? असा प्रतिप्रश्न केला.
हे सरकार मला तुरुंगात टाकेल, अशी भिती माझ्या आईला वाटत होती. या देशातील प्रत्येक आईला ही भिती वाटते, जेव्हा त्यांचा मुलगा या सरकारच्या विरोधात आवाज उठवतो. आपण किती काळ या सरकारला घाबरून जगणार ? ” असा प्रश्न अभिजीत दिपके यांनी विचारला.
या प्रश्नातून त्याची भावी वाटचाल कशी असेल, यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक व अन्य नेतेही सहभागी झाले होते. अनेक तरुण-तरुणी प्रश्न उपस्थित करत होते की, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणं तर दूरच राहिलं, ज्या परीक्षांवर देशातील लाखो तरुणांचं भवितव्य अवलंबून आहे, त्या परीक्षादेखील सरकार नीट घेऊ शकत नाही.हे सरकारचे अपयश नाही का ?
” सत्ताधारी पक्षाला हे आंदोलन सरकार विरोधातलं वाटत असलं तरी ते अशा व्यवस्थेविरोधातील आंदोलन आहे, जी कोणालाही जबाबदारी घेऊ देत नाही.एवढे महाभारत घडूनही शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये असलेला रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सरकारने आंदोलनाला परवानगी देऊन शहाणपणाचे काम केले आहे. कारण यापूर्वी झालेले जयप्रकाश नारायण, व्ही. पी. सिंग व अण्णा हजारे यांच्या आंदोलनापर्यंत सरकारनं जेव्हा अशी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती अधिकच चिघळली. त्यामुळं सरकारने या आंदोलनाला परवानगी देऊन पुढे होणारा अनर्थ टाळला आहे.

