वसंत भोईर,वाडा,
उद्घाटन होऊन दहा दिवस लोटले तरी धान खरेदी केंद्र अद्याप बंदच,
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी विक्री आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत असते.या केंद्रांचे उद्घाटन गेल्या शनिवार १४ डिसें.रोजी आमदारांच्या उपस्थितीत पार पडले.उद्घाटन होऊन दहा दिवस लाटले तरी या धान खरेदी विक्री केंद्रावर अजून भातखरेदी सुरू झालेली नाही.तसेच बारदानही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.बारदानशिवाय भात विक्री केंद्रावर भात घेतले जात नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी गेल्या कित्येक दिवसापासून बारदानासाठी धान खरेदी केंद्रावर हेलपाटे मारत आहेत.केंद्रचालक मात्र त्यांना जुने फाटलेले बारदान घेऊन जाण्यास सांगत आहेत. नवीन बारदाने येण्याची शक्यता नाही,त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
भात साठवणुकीसाठी शेतकऱ्यांकडे व्यवस्था नाही. मजुरांची कमतरता,अशा अनेक अडचणीचा सामना करत शेतकऱ्यांनी भात शेतातून घरी आणले आहे. बारदान शिवाय भात खरेदी केले जाणार नसल्याचे केंद्र चालक सांगत आहेत.गेला रब्बी हंगाम संपत आला तरी बारदान न आल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.मोठा गाजावाजा करत आमदारांच्या उपस्थितीत भातखरेदी केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले.मात्र अजूनही येथील शेतकरी,केंद्र सुरू होण्याच्या प्रतिक्षेतच आहेत. शेतकऱ्यांना बारदान पुरवण्याची जबाबदारी शासनाची असते.मात्र कोणत्या कारणामुळे बारदाने हे जात नाही.हे कळायला मार्ग नाही.या केंद्रावर नियंत्रण ठेवणारे आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी शेतकऱ्यांचे फोनच उचलत नाहीत.त्यामुळे कर्जाच्या ओझाखाली दबलेले शेतकरी खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार आणि आपला भात केव्हा खरेदी करणार अशा विवंचनेत सापडला आहे.
वाडा तालुक्यातील काही भातखरेदी केंद्रातील गोडाऊन केंद्र सुरू व्हायच्या आतच भरली असल्याचे काही शेतकरी सांगत आहेत.या संदर्भात आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते भात गोडाऊन मालकाने खाजगीत खरेदी केलेली असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे मात्र ही भरलेली गोडाऊन तत्काळ खाली करून त्याचे फोटो अधिकाऱ्यांतर्फे सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यामुळे याविषयी संशय अधिक बळावला आहे. अधिकारी मात्र या केंद्र चालकांना नेहमीच पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तरी शासनाने या केंद्रांवर लवकरात लवकर बारदानाचा पुरवठा करून धान खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

