वसंत भोईर, वाडा,
रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान
तालुक्यातील निचोळे ग्रामपंचायत हद्दीतील श्री कृष्णा फाॅर्म कंपनीतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या भाताचे नुकसान झाले आहे.प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निचोळे येथील श्री कुष्णा फॉर्म ही कंपनी येथील शेतकऱ्यांच्या शेतीला लागून असल्याने कंपनीतील प्रक्रियेतील रसायनयुक्त सांडपाणी,कंपनी शेतामध्ये सोडत असल्याने शेतीचे पूर्ण अतोनात नुकसान झाले आहे.
याबाबत अनेकदा वाडा तहसीलदारांना निवेदन दिले तरी काही एक उपयोग झाला नाही.पाण्यामुळे दुर्गंधी आणि सांडपाणी शेतात शिरते. त्यामुळे कोणतेही पीक येत नाही.अनेक वेळा तक्रार केली तरी अधिकारी गप्प आहेत. त्यांचे कंपनी मालकांशी साटेलोटे असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जात नाही,असा आरोप पीडित शेतकरी महेश पष्टे यांनी केला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्याय मिळावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कंपनीने भातशेतीत येणारे सांडपाणी तात्काळ बंद करून शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे कृषी विभागाकडून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
– भाई पष्टे,उपसरपंच ग्रामपंचायत निचोळे
या संदर्भात श्री कृष्णा फार्म कंपनीचे व्यवस्थापक सुरेश पष्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

