वसंत भोईर,वाडा
भाताचे भारे बांधण्याच्या बंध विक्रीतून मिळतोय आदिवासींना रोजगार,
शेतकऱ्यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध ( बांबूपासून तयार केलेला दोर ) विक्रीतून अनेक आदिवासी कुटुंबियांना किमान दोन महिने चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील चारशेहून अधिक कुटुंबांचे उपजिविकेचे हे एक साधन बनले आहे.
भात कापणी हंगामाला सुरुवात झाल्याने येथील आदिवासींचा बंध विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे,तर गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर भाताचे नुकसान केल्याने अनेक शेतकऱ्यांनी बंधचा वापर केला नव्हता.यंदा मात्र भात पिकाचे चांगले उत्पन्न आल्याने भारे बांधण्यासाठी बंधची मागणी वाढली आहे. बहुतांश शेतकरी ५०० ते १००० बंध खरेदी करतात. त्यामुळे वाडा,विक्रमगड तालुक्यातील शेकडो आदिवासींना चालू वर्षी चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
चौकट :-
दोन ते तीन दिवसांपूर्वीच तोडलेल्या ओल्या बांबूचे ५ ते ६ फुट लांबीच्या अंतरावर तुकडे केले जातात. हे तुकडे दगडावर ठेचून ३ ते ४ दिवस सुकवण्यात येतात आणि शंभर बंधांचा गठ्ठा करुन प्रती शेकडा तीनशे ते चारशे रु.पर्यंत बाजारपेठेत विक्री करतात.काही दलाल या बंधची सरसकट खरेदी करून बाजारपेठेत विक्री करत असतात.
वाडा तालुक्यातील परळी,ओगदा,उज्जेनी,आखाडा या भागातील शेकडो आदिवासी महिला व पुरुष बंध विक्रीचा दरवर्षी सप्टें.व ऑक्टो.या दोन महिन्यांत हा व्यवसाय करतात.या व्यवसायाच्या माध्यमातून येथील अनेकांना चांगला रोजगार मिळत असतो.विशेषतः महिलांच्या हाताला काम मिळाल्याने महिलांकडून अधिक मेहनत करत आहेत.
दोन महिने चालणा-या या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आमची चूल पेटत असते.
महादू भुजाडे – बंध विक्रेता, आखाडा, ता.वाडा.

