वसंत भोईर, वाडा
वाड्यात हळवार भातपिक कापणीला जोमाने सुरुवात,
जिल्ह्यातील भातपिक कापणीस तयार झाले असून वाडा तालुक्यातील शेतक-यांनी हळवार भातपिक कापणीला जोमाने सुरुवात केली आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळवार भातपिकाची लागवड करीत असतात.हे भातपिक ९० ते ११५ दिवसांच्या कालावधीत कापणीस तयार होत असते.हळवार भातपिक कापणीची ( लाणी ) लगबग सुरु असून येथील शेतकऱ्यांना अद्याप पावसाची भीती सतावत असल्यामुळे भातकापणीच्या ( लाणी ) काही नैसर्गिक नियमांना बगल देत कापणी सोबत एका बाजुला घाईघाईने झोडणीच्या कामालाही सुरुवात केली आहे.लहरी पावसाचा काही नेम नसल्याने तो कधीही पडू शकतो.या अशा भीतीच्या सावटाखाली शेतकरी असून प्लास्टिक ताडपत्रीचा आधार घेत तात्पुरत्या स्वरुपाचे शेतखळे तयार करून मिळेल त्या वेळेत झोडणीचे ही काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.
     भातकापणीच्या ( लाणी ) काही नैसर्गिक नियमांना बगल दिल्याचे
 दिसून येत आहे.भातपिकाची कापणी करून त्याला किमान दोन दिवस सूर्यप्रकाश ( ऊन ) देणे आवश्यक असते.त्यानंतर भारे बांधील करून उडवे रचून ऊब दिली जाते.अशाप्रकारची प्रक्रिया केल्यास भाताचा दाणा खडण्यास मदत होते. मात्र आता पावसाच्या भीतीने लाणीच्या काही नैसर्गिक नियमांना बगल देत शेतकरी कापणी सोबत झोडणीची कामे उरकून घेताना दिसत आहेत.यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी मिळेल त्या वेळेत भातकापणी सोबत झोडणीचे ही काम करीत आहे.
      वाडा तालुक्यातील शेतकरी हळवार,निमगरवा, गरवा व अतिगरवा अशा प्रकारच्या भातपिकाची लागवड करीत आहेत.हळवार भातपिक हे ९० ते ११५ दिवस,निमगरवा भातपिक १२० ते १३० दिवस,गरवा भातपिक १३० ते १५० दिवस तर अतिगरवा १५० दिवसांच्या पुढील दिवसात कापणीस तयार होत असतात.आजच्या घडीस ९० ते ११५ दिवसांचा कालावधी लागणारा हळवार भातपिक कापणीस तयार झाले असून
तालुक्यातील सर्वत्र हळवार भातपिक कापणीला सुरुवात करण्यात आल्याने मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

 
									 
					

