वसंत भोईर,वाडा
वाड्यात भातपीक नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात,
वाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने भात पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.या नुकसानीची पाहणी करण्यास आज दुपारनंतर सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाडा कोलम,वाडा झिणी हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे.या वाणाबरोबरच गुजरात ४,गुजरात ११,सुरती, पुनम,जया,कोलपी,रत्ना, कर्जत ३,कर्जत ४ आदी वाणांची लागवड तालुक्यात केली जाते.१५ हजार हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड तालुक्यात होत असते.यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते,मात्र गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्याने तसेच तानसा, वैतरणा व मोडकसागर या धरणांचे पाणी सोडल्याने नद्यांचे पाणी भातशेतीत घुसले आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी महसूल विभागाला दिले. त्यानंतर कृषी विभागाने गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.तालुक्यातील चिंचघर पाडा येथील भातपीकाची कृषी सहा.यांनी पाहणी केली.

