वाडा प्रतिनिधी
वाड्यात भात लागवडीवर “बगळ्या,” रोगाचा प्रादुर्भाव,
यंदा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत होता.भात रोपाची लागवड केलेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे भात पिकावर बगळ्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संकटामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्याची ओळख भाताचे कोठार म्हणून आहे.येथे मोठ्या प्रमाणावर भातपिकाचे उत्पादन घेतले जात असून वाडा कोलम तांदुळ देशभरात नावारूपाला आला आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीत लागवड केलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुका कृषी विभागाने शेतक-यांना मदतीच्या दृष्टिकोनातून गावा- गावातील बाधित शेतकऱ्यांची तात्काळ माहिती घेऊन त्यांना औषध फवारणीसाठी योग्य मार्गदर्शन व मदत करावी,अशी मागणी शेतकरी करत आहेत.तसेच भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावेत.कृषी विभागातर्फे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. हातातोंडाशी आलेला घास वाया जाईल,अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

