वसंत भोईर,वाडा
अवकाळी पावसामुळे वाड्यातील भातशेतीची दैना,
तालुक्यात भात कापणी जोमात सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे.पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले असून, मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या या अवकाळी पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान होत आहे.
तालुक्यात सध्या भातकापणी वेगाने सुरू असून,अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला आहे. पण सततच्या पावसामुळे कापलेले पीक ओले झाले आहे.मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास पडणाऱ्या पावसामुळे भाताचे पीक सुकत नाही आणि ते आता वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. भिजलेल्या भातपिकांचे कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून सततच्या पावसामुळे शेतीची दैना उडाली असून बळीराजा सध्या मेटाकुटीस आला आहे.
सगळी नक्षत्रे संपली तरी पाऊस अजून गेलेला नाही. दिवाळीमध्ये भातकापणीला जोमाने सुरुवात होते.अनेक शेतकऱ्यांनी मजुरांची जमवा जमव करून कापणीला सुरुवात देखील केली आहे. कापून ठेवलेले भात पावसाने भिजल्यामुळे ते अद्याप शेतातच आहे.अधून मधून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हातातोंडाशी आलेले भातपीक पावसामुळे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.ज्यांनी पीक कापले नाही,त्यांना थोडाफार आधार आहे.अजून चार दिवस पावसाचा अंदाज असल्याने भातपीक कापायचे की नाही अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
शासनाने कृषी विभागाला त्वरित भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ऐन कापणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे उभी पिके आडवी झाली असून ती पाण्यात कुजण्याची भिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह केवळ भातशेतीवरच अवलंबून असून उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.बी,बियाणे, अवजारे आणि वाढती मजुरी अशा विविध कारणामुळे हवालदिल झालेला शेतकरी शासनाच्या मदतीची चातकासारखी वाट पाहत आहे.यावर्षी भातशेती उत्तम प्रकारे झाली होती.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साही वातावरण होते.परंतु अवकाळी पावसाने दगा दिल्याने फार मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने ओळा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

