वसंत भोईर,वाडा
भातपिकाच्या नुकसानापोटी फक्त २ रू. ३० पैशांची भरपाई,
वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले असून हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे.सोन्यासारखे आलेले भातपिक अद्याप शेतात पडून आहे.त्यावर पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहेत.हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून त्यावर सरकार देखील मीठ चोळण्याचे काम करत आहे.
तालुक्याच्या शिल्लोत्तर येथील एका शेतक-याला नुकसानभरपाई म्हणून फक्त २ रू.३० पैसे बॅंक खात्यात जमा झाल्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते.वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून त्याला बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातपीक चांगले आले होते.सोन्यासारखे पीक आल्याने शेतकरी आनंदात होते,मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली.सोन्यासारखे भातपीक अक्षरश: मातीमोल झाले.परतीच्या सततच्या पावसाने भातपीकाला झोडपून काढले.कापणीस आलेले भातपीक शेतातच आडवे झाले.त्यावरून पाणी वाहून गेले,अनेक दिवस पीक पाण्यात राहील्याने आता भाताला कोंब आले आहेत.भाताबरोबर पेंढाही काळा पडल्याने जनावरेही या पेंढ्याला तोंड लावत नाहीत.त्यांच्यावरही आता उपासमारीची वेळ येणार आहे.
सरकारकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले.त्यानंतर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर येथील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील या शेतक-याची एकूण जमीन ११ एकर इतकी आहे.त्यांच्या नावावर सात एकर पत्नी व मुलीच्या नावे चार एकर अशी एकूण जमिन असताना पाटील यांना नुकसानभरपाई पोटी सरकारकडून २ रू.३० पैसे त्यांच्या बॅक खात्यात जमा झाले.त्यानंतर गेल्या शुक्रवारी त्यांच्या मोबाईलवर मेसेज गेल्यावर त्यांना धक्काच बसला.लाखो रू.नुकसान झाले असताना फक्त २ रू. ३० पैसे नुकसानभरपाई देऊन सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले, अशी भावना शेतकऱ्यामध्ये पसरली असुन पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भातशेतीचे झालेले नुकसान,
मधुकर पाटील
बॅंक खात्यात जमा झालेली रक्कम,
IDBI Bank A/C NN52696 credited INR. 2.30 Det:PRADHAN MANTRI FASAL-A30425001. Bal (incl. of chq in clg) INR. 3030.32 as of 31OCT 18:14 hrs.

