संदीप जाधव,बोईसर
किराट येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा,
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून किराट गावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात पेसा कायद्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला.प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या परेश बाबुराव पावडे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून ग्रामसभेचे महत्त्व आणि पेसा कायद्याविषयी बहुमोल माहिती दिली.
परेश पावडे यांनी आपल्या भाषणात जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले, “आदिवासी समाजाचा वारसा,संस्कृती आणि त्यांचे अधिकार व हक्काचे संरक्षण करणे,हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.पेसा कायदा हा आदिवासींच्या सक्षमीकरणाचा पाया असून, याच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवत विकास साधावा.”
पावडे यांनी पेसा कायद्याच्या अंतर्गत ग्रामसभेला असलेले अधिकार,विकासाच्या कामात त्याची भूमिका,आणि गावकऱ्यांच्या सहभागाचे महत्त्व,याविषयी मुद्देसूद विवेचन केले. “ ग्रामसभा ही गावच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे,आणि तिच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने मजबूत पाऊले टाकता येते ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात सरपंच अंजू राजेश सांबरे,उपसरपंच शैलेश हरिचंद्र वेडगा,ग्रामसेवक निखिल चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य,तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरा जपण्यावर भर देत ग्रामस्थांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त पारंपरिक नृत्य, गाणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने पेसा कायद्याचा प्रभावी वापर करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प केला. परेश पावडे यांच्या प्रेरणादायी भाषणाने ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी एकत्र काम करण्याची तयारी ग्रामस्थानी व्यक्त केली.

