दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
राष्ट्रीय शेतकरी दिन ; शासकीय पातळीवर शुकशुकाट,
” जगाचा पोशिंदा,” अशी ओळख असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसें.राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात येतो.या दिनी देशभरातील अन्नदात्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यात येतो.मात्र यंदा या दिनी सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.आपले राज्यसरकार खातेवाटप व मंत्र्यांना बंगले वाटप या प्रक्रियेत अडकून पडले होते.मुख्यमंत्री व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना कदाचित या दिनाचे महत्व वाटले नसावे.
दरवर्षी या शेतकरी दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते,पण गेल्या काही वर्षात केंद्र व राज्य सरकार या प्रश्नी प्रचंड उदासीन असल्याचे दिसून आले आहे.आपल्या देशाची ओळख ही कृषिप्रधान देश अशी आहे.५२ % लोकांची ” शेती,” हे उपजीविकेचे साधन आहे.या शेतकऱ्यांमुळे आपल्याला दोन वेळचे जेवण मिळते,त्यामुळे त्याचा सन्मान व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिन साजरा केला जातो.२००१ साली माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त हा राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.देशातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी,यासाठी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी आपले उभे आयुष्य वेचले.ते स्वतः शेतकरी कुटुंबातील होते,त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथेची चांगली जाण होती.त्यांनी आपल्या कार्यकाळात कृषी क्षेत्रात विविध सुधारणा केल्या.पण हा अन्नदाता सध्या आपल्या अस्तित्वासाठी धडपडत आहे.निसर्गाचा कोप,उत्पादित मालाला योग्य हमीभाव न देणे,पीक विमा योजनेत होणारी घोर फसवणूक,खरेदी-विक्री प्रक्रियेतील बजबजपुरी,अशा विविध कारणांनी तो आता आत्महत्येच्या वाटेवर जाऊ लागला आहे.त्यांच्या या अवस्थेकडे बघायला आपल्या मुर्दाड राज्यकर्त्यांना तसेच झारीतील शुक्राचार्यांना वेळ नाही.काल हा दिन साजरा करण्यासंदर्भात शासकीय पातळीवर जी उदासीनता पाहायला मिळाली,तिचा निषेध करावा,तेवढा थोडाच…

