सुहास जोशी,औरंगाबाद,
संतोष देशमुख हत्या : ९ जाने.रोजी राज्यातील ग्रामपंचायती बंद पाळणार,
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषधार्थ राज्यातील सर्व ग्रामपंचायती ९ जाने.रोजी बंद पाळणार आहे,अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसें.रोजी हत्या करण्यात आली होती.त्यानंतर सरपंच परिषदेने देशमुख कुटुंबीयांची काल भेट घेतली.महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या अमानुष,अमानवीय पद्धतीनं ही हत्या झाली असून यामधील आरोपींवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही,अशा पद्धतीचे कडक शासन आरोपींना करावे,अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे.
संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती येत्या ९ जाने.या दिवशी बंद राहतील,अशी माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.राज्यभरातील सरपंच मस्साजोगमधील या घटनेमुळे हादरले आहेत. समाजसेवा करणे पाप आहे का ? असा प्रश्न राज्यातील सरपंचांना पडला आहे.त्यामुळे याप्रकरणी सरपंच संघटना आक्रमकपणे भूमिका मांडत असून दोषी असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे,अशी त्यांनी मागणी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या परिवाराला शासनाने कायमस्वरूपी संरक्षण द्यावं.त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत शासनाने करावी,अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे.तसेच संतोष देशमुखांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी आणि संतोष देशमुख यांचं भव्य असं स्मारक या गावांमध्ये उभारण्यात यावे,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

