सुरेश वैद्य,पालघर
पर्यायी रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन,
नवली रेल्वे फाटक बंद केल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून पर्यायी मार्गाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नवली व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांची भेट घेऊन त्यांना नागरिकांच्या होणार्या गैरसोयीची सविस्तर माहिती दिली.
नवली रेल्वे फाटक परिसरात अनेक शाळा,तहसील कार्यालय,तलाठी कार्यालय, शासकीय आरोग्य केंद्र असुन येथे येणाऱ्या नागरिकांची सतत वर्दळ सुरु असते.पूर्व भागातील नवली,वेवूर, डॉ.आंबेडकरनगर, भीमाईनगर,कमारे,वरखुंटी, भोगोलेपाडा अशा अनेक गावपाड्यातील शेकडो ग्रामस्थ,असंख्य विद्यार्थी, नोकरदार यांना दैनंदिन कामासाठी पूर्व-पश्चिम रहदारीचा एकमेव जवळचा मार्ग म्हणजे नवली रेल्वेफाटक असल्याचे या शिष्टमंडळांने यावेळी
निदर्शनास आणून दिले.सदर रेल्वेप ” अ,” क्रमांकाच्या फाटकावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे.हे काम मे २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते,परंतु पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही पुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे.अशी स्थिती असताना रेल्वे प्रशासनाने १० एप्रिल २०२५ रोजी अचानकपणे नवली रेल्वे फाटक बंद केले.परिणामी या भागातील नागरिकांना पूर्णपणे वळसा घेत पश्चिम आणि पूर्वेकडे ये-जा करावी लागते.त्यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थ,महिला आणि वृद्धांची मोठी गैरसोय होत आहे.रेल्वे व जिल्हा प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने फाटकाच्या दक्षिणेस रेल्वे रूळाखाली असलेल्या एका नैसर्गिक नाल्याला पर्यायी मार्ग तयार करण्यात आला.
जिल्हाधिकारी देण्यात आलेल्या निवेदनातील तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपजिल्हाधिकारी महेश सागर,सा.बां.विभाग पालघरचे उपकार्यकारी अभियंता चव्हाण यांनी समर्पित रेल्वे मालवाहतूक प्रकल्प अधिकार्यांसोबत तात्काळ प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

