दीपक मोहिते,
३१ डिसें.च्या पार्श्वभूमीवर रिसॉर्टस हाऊसफुल्ल,
नाताळ व नववर्ष स्वागत दिनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेले रिसॉर्टस आतापासूनच हाऊसफुल्ल झाले आहेत.त्यामुळे मुंबई,ठाणे परिसरातील अनेक पर्यटकांनी आता आपला मोर्चा अलिबाग,मुरुड-जंजिरा,
लोणावळा-खंडाळा या परिसराकडे वळवला आहे.
डिसेंबर महिन्यात अनेक सुट्या असल्यामुळे चाकरमान्यांनी आपल्या कुटुंबियांसह समुद्रकिनारी असलेल्या निसर्गरम्य पहिली पसंती दिली.पण येथे असलेल्या तमाम रिसॉर्टसची बुकिंग एक महिन्याअगोदर झाल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली.” स्वस्त आणि मस्त,” अशी ही रिसॉर्टस मुंबईपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असलेल्या अर्नाळा,कळम्ब,नवापूर-
राजोडी,या परिसराला पर्यटक प्राधान्य देत असतात.या रिसॉर्टसमध्ये डीजे,तरणतलाव,रेनडान्स,शाकाहारी/मांसाहारी जेवण,चहा/नाश्ता आदींची रेलचेल असल्यामुळे तरुणाई नाताळ व नववर्ष दिन येथे साजरा करण्यासाठी गर्दी करत असतात.परंतु ही सारी रिसॉर्टस सध्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे अनेक कुटुंबांनी आता ठाणे व कोकण परिसरातील पर्यटन स्थळाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

