जव्हार,प्रतिनिधी
जव्हार येथे विविध उपक्रमांद्वारा संस्कृतीचे दर्शन,
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. ज्युनिअर कॉलेज,जव्हार येथे विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रम तीन टप्प्यांमध्ये पार पडला.
पहिल्या सत्रात रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विद्यार्थ्यांनीअळू,माठ,अंबाडी, तेरं,कुरडू,कोथळी,शेवग्याचे पान,पेंडरे अशा स्थानिक रानभाज्यांचे माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.यावेळी परीक्षक म्हणून दांगटे व कोरडे यांनी सादरीकरणाचे मूल्यमापन केले.
दुसऱ्या सत्रात मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवरे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून तालूका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांचा तसेच नशामुक्तीचे कार्यकर्ते मिलिंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोज कामडी यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्व,आदिवासी संस्कृतीचा गौरव,रूढी-परंपरांचे संवर्धन आणि युवकांमधील सामाजिक जागृती यावर विचार मांडले.तर मिलिंद पाटील यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने समाजसुधारक बिरसा मुंडा यांच्यावर मार्गदर्शनपर भाषण केले. त्यांनी आदिवासी समाजातील व्यक्ती ना ताडी,हंडिया महुआ हे सर्व मादक पदार्थ सैतानाचे घर आहे.या मादक वस्तूंमुळे बुध्दी जड होते.लोक नशाखोर होतात.लोक नशेच्या अवस्थेत अमानवीय काम करतात,अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे सेवन करू नका,असे आवाहन केले. तसेच त्यांनी आज तरुणांच्या या मोहिमेला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता आज महाराष्ट्राची वाटचाल व्यसनमुक्त महाराष्ट्राकडे होत आहे.राज्य व देश बलशाली करण्यासाठी व्यसनांपासून दूर राहावे, आयुष्यात आलेल्या चढ उतारांमुळे मानसिक खच्चीकरण होऊन व्यसनाच्या आहारी जाऊ नका,संघर्ष करा निर्व्यसनी राहून व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा हातभार लावा,असे आवाहन उपस्थित तरुणांना त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एम.शेवाळे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल अहिरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर भोईर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अखेरीस पारंपरिक लोककलेचे सादरीकरण करण्यात आले. तारपा नृत्य,समूहगीत, पारंपरिक नृत्य यांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात रंगतदार सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे आयोजन संतोष यादव,सुधर्म काळे,चौधरी, श्रीराम गरड यांच्या सहकार्याने तर नियोजनात कांचन दांगटे मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले.जागतिक आदिवासी दिन हा केवळ एक सण नसून, आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक ठेव्याचे स्मरण आणि संवर्धनाचे प्रेरणास्थान आहे, हे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले.

