दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
दादा भुसे यांनी राज्याच्या शिक्षण विभागापासून सुरू करावे…
नवनिर्वाचित शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील गरीब मुलांना चांगले शिक्षण देऊ,असे जाहीर केले आहे.त्यांच्या या वक्तव्याचे राज्याच्या जनतेने स्वागत करायला हवे.त्यांच्या या वक्तव्याचे सध्या वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहे.आतापर्यंत देण्यात आलेले शिक्षण चांगले नव्हते का ? असा प्रश्न नक्कीच तुमच्या-आमच्या मनात उभा ठाकतो.
असो,पण त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खरी ठरो,अशी आपण प्रार्थना करूया.मात्र हा निर्णय घेताना त्यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सद्यस्थिती,शिक्षणाचा सुमार दर्जा,खालावत चाललेली विद्यार्थ्यांची पटसंख्या,बंद पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा व राज्याच्या शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार,या सर्व गैरप्रकारावर आळा घालण्याचे काम त्यांनी करायला हवे.तसे झाले तरच ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल.आज राज्याच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था लक्षात घेता,दादा भुसे यांनी सर्वप्रथम आपल्या शिक्षण विभागामध्ये झाडाझडती करण्याची गरज आहे.ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांची संख्या कमी होण्याऐवजी ती सतत वाढत का आहे ? याचा आढावा घेतला पाहिजे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये का पाठवत नाहीत,त्यामागची कारणे काय आहेत ? याचा भुसे यांनी शोध घ्यायला हवा.तसेच राज्यातील निरक्षरतेचे प्रमाण कमी का होत नाही,याचा थेट संबंध आपल्या शिक्षण व्यवस्थेशी आहे,हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.या सर्व ज्वलंत प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्यांनी शोध घेऊन साफसफाई केली तरच गरीब मुलांना चांगले शिक्षण देणे,ही त्यांची घोषणा प्रत्यक्षात उतरू शकेल.अन्यथा त्यांचे हे वक्तव्य म्हणजे ” बोलाची कढी आणि बोलाचाच भात,” ठरण्याची शक्यता अधिक आहे.

