संदीप जाधव,बोईसर,
वनसंपदेचा विनाश, प्रशासनाचा ढिसाळ कारभार,
पालघर तालुक्यातील किराट गावात वनविभागाच्या सीमेलगत सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकामांमुळे पर्यावरण,वन्यजीव आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरुंग स्फोट केले जात असून,निसर्गाचा ऱ्हास,भूकंपासारखे धक्के, आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर होत असलेले दुष्परिणाम स्पष्ट दिसून येत आहेत.मात्र,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गैरप्रकाराला आळा घालण्याऐवजी तो वाढत चालला आहे.
किराट गावातील अनेक घरांतील लोक स्फोटांमुळे होणाऱ्या भूकंपसदृश धक्क्यांमुळे भीतीच्या वातावरणात जगत आहेत.सततच्या स्फ़ोटामुळे त्यांच्या घरांमध्ये तडे जात आहेत.या अशा वातावरणामुळे त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही महसूल आणि वनविभाग या प्रकरणी डोळेझाक करत आहेत. स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाचा हा मुर्दाडपणा राजकीय दबावामुळे सुरु आहे.
सुरुंग स्फोट आणि अनियंत्रित उत्खननामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होत आहे.विशेषतः पक्षी, रानडुकरं,ससे आणि लहान प्रजातींचे प्राणी आपल्या वनातून पळ काढत आहेत. पर्यावरणतज्ञांच्या मते,या स्फोटांमुळे परिसरातील औषधी व मौल्यवान वनस्पती नष्ट होत असून भूगर्भातील पाणी पातळी खालावत आहे. हा विनाश त्वरित थांबवला नाही,तर पर्यावरणाचे संतुलन कायमस्वरूपी बिघडेल.”
सरकारने मुंबई-वडोदरा महामार्गाजवळील 500 मीटरच्या परिसरात उत्खननावर बंदी घालणारे आदेश दिले असतानाही, किराट गावात बेकायदेशीर उत्खनन वेगाने सुरू आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांनी स्फोटांवर बंदी आणण्यासाठी तत्काळ पावलं उचलली नाहीत,तर लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.”
किराट गावातील पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि वनविभागाला जागं करण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवला आहे.त्यांनी तातडीने पर्यावरणाचे सर्वेक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय,तज्ञांच्या देखरेखीखाली वनक्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली जावी,अशी स्थानिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.

