दिपक मोहिते,
आनंदाचा उत्सव,
” जिंगल बेल,जिंगल बेल,जिंगल ऑल द वे,” ची धून लवकरच ऐकायला मिळणार,
२५ डिसें.रोजी साजरा होणाऱ्या नाताळ सणाचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.दरवर्षी देशभरात नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.गोव्यात या निमित्ताने अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात.येथे होणाऱ्या कार्नीव्हलचे विशेष आकर्षण असते,त्यासाठी या अनेक देशातील पर्यटक गोव्यात दाखल होत असतात.पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातही दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
मुंबईलगत असलेल्या पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यात ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने राहतो.त्यामुळे येथे नाताळ उत्साहात साजरा होत असतो.नाताळ गोठा,ख्रिसमस ट्री,सांता क्लॉज,आकर्षक कंदील,रंगीबेरंगी आकर्षक पेहराव,केक व अन्य खाद्यपदार्थ,याचा त्यामध्ये समावेश असतो.नाताळ सणाच्या अगोदर मध्यरात्री चर्चेसमध्ये सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर हा सण साजरा करण्यास सुरुवात होते.समाजबांधव आपल्या आप्तस्वकीयांच्या भेटी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देतात.या दिवशी तरुण-तरुणी,येशूचा जन्म हा नाताळ गोठ्याच्या माध्यमातून साकारतात.हे आकर्षक नाताळ गोठे पाहण्यासाठी सर्वधर्मातील लोक भेटी देत असतात.नाताळ दिनी मध्यरात्री बाळगोपाळांचा आवडता सांताक्लॉज अवतरतो आणि आपल्या पोतडीतून विविध खेळणी,चॉकलेट्स व अन्य साहित्य देऊन जातो.या सांताक्लॉजच्या प्रतिक्षेत बाळगोपाळ रात्र जागून काढतात.ख्रिसमस ट्री व विविध फ्लेवरचे केक,हे देखील या सणाचे विशेष आकर्षण असते.तसेच या दिवशी ख्रिस्ती तरुण-तरुणी विविध संगीताचे कार्यक्रम आयोजित करत असतात.हा सण साजरा करण्यापूर्वी चार दिवस अगोदर तयारी करण्यात येत असते.सध्या बाजारात खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे.हा सण केवळ एक दिवस नाही,तर थेट ३१ डिसें. पर्यंत साजरा होत असतो.या दिवशी सरत्या वर्षाला बाय,बाय व येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यात येते.त्यासाठी डान्स,स्पर्धा व अन्य उपक्रम राबवण्यात येत असतात.

