दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शिंदे व पवार यांची सध्याची अवस्था,” सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,”
भाजपने जागा,मंत्रीपदे व खातेवाटप,यावरून शिंदे गटाला नामोहरम केल्यानंतर आता अजित पवार गटाची शिकार करण्याची तयारी चालवली आहे.अजित पवार गटाला यावेळी पुणे व रायगड या दोन जिल्ह्याची पालकमंत्रीपदे मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
वर्षभरापूर्वी अजित पवार गटाला सोबत घेताना भाजपने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले होते व ते अजित पवारांकडे सोपवले होते.पण यावेळी भाजप अजित पवारांच्या तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत आहे.खातेवाटपात अजित पवार यांना अर्थखाते मिळण्याचीही शक्यता नाही.पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे भाजप त्यांची कोंडी करण्यासाठी सध्या चाल खेळत आहेत.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केलेली गळचेपी यशस्वी ठरल्यानंतर भाजप आता अजित पवार गटाच्या मुसक्या बांधायच्या कामाला लागले आहे.सुरुवातीस जागा वाटपात अमित शहा यांनी शिंदे व पवार या दोघांचे नाक दाबून सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या.त्यामुळे निकालात त्याचे दृश्यपरिणाम पाहायला मिळाले.भाजपच्या पदरात १३३ तर शिंदे गट-५५ व अजित पवार गट -४१,असे बलाबल तयार झाले.” ज्यांच्या जागा अधिक,त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद,” या सूत्रानुसार अमित शहा हे मुख्यमंत्रीपद मिळवण्यात यशस्वी झाले.आज माजी मुख्यमंत्री शिंदे निवांत असून त्यांना आपले कट्टर समर्थक असलेले केसरकर,सत्तार, सावंत व अन्य आणखी एका आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळवून देता आले नाही.आता खातेवाटपात महत्वाची खाती या दोन्ही गटांना देण्यास भाजप तयार नाही.शिंदे यांनी नगरविकास,सार्वजनिक बांधकाम,महसूल,या तीन महत्वाच्या खात्याचा आग्रह धरला आहे.पण त्यांना सार्वजनिक बांधकाम व महसूल ही दोन खाती मिळतील.अजित पवार यांना अर्थ,ग्रामविकास व जलसंपदा,ही तीन खाती देण्यात यावीत,अशी मागणी रेटली आहे.पण फडणवीस हे त्यांना अर्थखाते त्यांना देणार नाहीत.पालकमंत्री पदावरूनही अजित पवार गटाची कोंडी होणार आहे.रायगड व पुणे या दोन्ही जिल्ह्याची पालकमंत्रीपदे आम्हाला मिळावीत,अशी त्यांनी मागणी केली आहे.पण या दोन्ही जिल्ह्यावर अनुक्रमे शिंदे गट व भाजपने दावे केले आहेत.पवार गट, रायगड येथे अदिती तटकरे तर शिंदे गट हे भरत गोगावले यांच्यासाठी आग्रही आहेत.पुण्यासाठी भाजपचे चंद्रकांत पाटील तर अजित पवार हे स्वतः शर्यतीत आहेत.या सर्व घडामोडीवरून भाजप आता शिंदे गटाच्या गळचेपीनंतर अजित पवार गटाचे नाक दाबू पाहत आहे.भाजपचे हे दबावतंत्र सहन करण्याशिवाय शिंदे व पवार यांच्यासमोर अन्य दुसरे पर्याय नाहीत.त्यामुळे आज त्यांची अवस्था ” सहनही होत नाही,आणि सांगताही येत नाही,” अशी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

