वाडा प्रतिनिधी,
महाविकास आघाडीचा करवाढीविरोधात नगरपंचायतीवर मोर्चा,
वाडा नगरपंचायतीतर्फे निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणीच्या नोटीशा बजावण्यात आल्या असून पूर्वीच्या करापेक्षा दुप्पट तिपटीने करवाढ केली आहे.या वाढीव करवाढीचा बोजा नागरिकांना पडणार असल्याच्या निषेधार्थ व कर वाढ रद्द करावी,या मागणीसाठी आज महाविकास आघाडीतर्फे वाडा नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.वाढीव करवाढ रद्द न केल्यास दिवाळी सण नगरपंचायत कार्यालयात साजरी करू,असा इशारा नेत्यांनी प्रशासनाला दिला.
वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली व दुय्यम दर्जाची ग्रामपंचायत असून त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबत वृक्ष कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,अग्निशमन कर,उपयोग कर्ता अशा अतिरिक्त करामध्ये वाढ झाली आहे.अचानक झालेल्या करवाढीमुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे. नव्याने लादण्यात आलेली अन्यायकारक करवाढ येथील व्यापारी व नागरिकांना परवडणारी नाही.
नागरिकांच्या संतप्त भावनेचा विचार करून करवाढ शिथिल करावी,या मागणीकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या ज्योती ठाकरे,सहसंपर्कप्रमुख निलेश गंधे,काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उपजिल्हाध्यक्ष गोविंद पाटील, प्रकाश केणे, तालुकाप्रमुख निलेश पाटील,माजी नगराध्यक्ष गितांजली कोळेकर,आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोर्चाची दखल घेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे हे मोर्चा स्थळी येऊन त्यांनी करवाढ तात्पुरती स्वरूपात स्थगित केली असल्याची माहिती मोर्चेकरांना दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.

