दीपक मोहिते,
भाजपला रोखणे,ठाकरे बंधूंना शक्य होणार नाही,बविआ देखील सध्या संभ्रमावस्थेत,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी राज्यस्तरावर शिवसेना ( उबाठा ) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना,या दोन पक्षात युती होण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे.या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) सोबत घेण्यासंदर्भात सेनेचे नेते खा.संजय राऊत प्रयत्नशील आहेत.तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मात्र मनसेला सोबत घेऊन निवडणुका लढण्यास तयार नाही.त्यामुळे आजच्या घडीला भारतीय राष्ट्रीय पक्ष स्वबळावर रिंगण्यात उतरण्याच्या तयारीत आहे.शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील या दोघा ठाकरे बंधू सोबत जातील,असे वाटत नाही.

या सर्व घडामोडीकडे भाजप मात्र बारकाईने पाहत असून सेना – मनसे यांचे एकत्र येणे,हे आपल्याला किती त्रासदायक ठरू शकते ? याचा अंदाज ते साध्य घेत आहेत.अशाप्रकारची युती झाल्यास गुजराती,मारवाडी,उत्तर भारतीय व दाक्षिणात्य समाज या युतीला मतदान करणार नाही.हिंदी भाषेसंदर्भात दोघा भावाची असलेली ताठर भूमिका व राज ठाकरे यांच्याकडून परप्रांतीयांविरोधात सतत होणारी आगपाखड,अशा दोन कारणामुळे दोन्ही काँग्रेस,या दोघा भावाच्या युतीपासून दोन हात लांब राहतील,अशी शक्यता आहे.त्यामुळे शिवसेना ( उबाठा ) व मनसे या दोन पक्षात होणारी युती ही भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे.ही युती भाजपला त्रासदायक ठरण्याऐवजी भाजपला ती फायदेशीर ठरण्याची शक्यता अधिक आहे.मुंबई, ठाणे,नवी मुंबई,पुणे,औरंगाबाद,
नाशिक,नागपूर,सोलापूर,भिवंडी,कल्याण – डोंबिवली व वसई – विरार या महानगरपालिका क्षेत्रात परप्रांतियांची लोकसंख्या लक्षणीय आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परप्रांतियांनी आपल्या मताचे भरघोस दान भाजपच्या पारड्यात टाकले,त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप थेट १३७ जागापर्यंत मजल मारू शकला.अर्थात त्यांच्या या विजयात लाडक्या बहिणी योजनेचा देखील मोलाचा वाटा होता.विधानसभा निवडणुकीत शिवसेना व मनसेचे जे काही ” होत्याचे नव्हते,” झाले,त्याला परप्रांतियांची नाराजी कारणीभूत ठरली.अशा परिस्थितीत बहुजन विकास आघाडी,वसई – विरार क्षेत्रात शरद पवार यांची राष्ट्रवादी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा दोघा ठाकरे बंधू सोबत गेली तर त्यांना फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल.त्यामुळे बहुजन विकास आघाडीने युती व आघाडी न करता स्वबळावर ही निवडणूक लढवायला हवी.वसई व नालासोपारा या दोन्ही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व नाममात्र आहे,त्यामुळे त्यांच्यासोबत जाणे,हे स्वतःचा कपाळमोक्ष करून घेण्यासारखे आहे.तसेच राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर येथील शिवसेनेचे ( उबाठा ) मोठ्याप्रमाणावर खच्चीकरण होत गेले.तर मनसे गेल्या १७ वर्षात बाळसं धरू शकले नाही.आजही ते कुपोषितच आहे.

