संदीप लहांगे, डहाणू,
अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश,
पंचायत समिती सभागृह डहाणू येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रवींद्र शिंदे,यांनी गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी ( पंचायत ),विस्तार अधिकारी ( सांख्यिकी ), सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची समन्वय आढावा सभा घेऊन विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रुपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा,आणि पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रवीण भावसार,गट विकास अधिकारी पल्लवी सास्ते,पंचायत समिती डहाणू, तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना
सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंतची प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांची अपूर्ण घरकुले माहे जानेवारी २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुचना दिल्या. लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण करत नसतील तर सदर घरकुलांना वाटप केलेले अनुदान शासन खाती भरणा करुन सदरची घरकुले रद्द करणत यावी. तसेच सन २०२४-२५ वर्षातील सर्व योजनांची घरकुले मार्च २०२५ अखेर पर्यंत पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.अशा सूचना रवींद्र शिंदे यांनी दिल्या.
यावेळी घरकुलांचे काम मार्च अखेरीस पूर्ण न झाल्यास ग्रामसेवकांच्या घरभाडे भत्ता व एकस्तर वेतन कपात करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले
शासकीय जमीनीवरील घरकुलांबाबत शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करुन प्रलंबित घरकुले पूर्ण करण्यात यावीत,असेही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
हळदपाडा,सायवन आणि धानीवरी ग्रामपंचायतींचे १०० % घरकुलांचे प्रस्ताव मान्य झाल्यामुळे सदर ग्रामसेवकांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.तसेच त्यांनी इतर ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करावे,असेही सूचित करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.तसेच यावेळी पंचायत समिती मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शपथ घेण्यात आली.
ग्रामसेवकांनी आपले रेकॉर्ड अद्यावत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून त्याचे गांभीर्य ग्रामसेवकांनी लक्षात घ्यावे असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत विभागामधील जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत सन २०२३-२४ वर्षातील अपूर्ण कामे १५ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत,तसेच मंजूर कामे माहे मार्च २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यांत यावीत, २०२५-२६ चे आराखडे सादर करताना शासन निर्णयाप्रमाणे कामे घेण्यांत यावीत तसेच ग्रामपंचायतीकडील शिल्लक रक्कमे इतकीच कामे प्रस्तावित करण्याची दक्षता घेण्यात यावी.शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभा घेण्याची दक्षता घेण्यात यावी,१५ वा वित्त आयोगांतर्गत बंधित व अबंधित सन २०२०-२१ ते २०२३-२४ पर्यंतची सर्व कामे पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.
१५ वा वित्त आयोगांतर्गत कामांवरील शासकीय वजातींचा भरणा संबंधित खात्यांवर करण्याची दक्षता घेण्यांत यावी. ग्रामपंचायतीमधील सर्व घरपट्टी धारकांना घरपट्टी आकरणी देयकांची बजावणी डिसेंबर पर्यंत पूर्ण करुन तसा अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करावा,ग्रामपंचायतीकडील कर वसुली १००% पूर्ण करण्याची कार्यवाही अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
नरेगाची कामे जास्तीत जास्त वाढतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.सोपी कामे करून लोकांना घरबसल्या रोजगार मिळेल तसेच गावात सुविधा होईल या पद्धतीने नरेगाची कामे करावी,अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
ग्रामरोजगार सेवक जेथे नसतील तेथे त्वरित ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात यावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
घरपट्टी व पाणीपट्टी १०० % ची बिले ८ दिवसात बजावण्यात यावीत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सर्व ग्रामपंचायतींनी शासनाने नेमलेल्या निविदाकाराकडून कचराकुंड्या,ई-व्हेईकल खरेदी करणेबाबत कार्यवाही करणे,वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये पूर्ण करणे,
सार्वजनिक शौचालयांतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाचा आढावा घेताना देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी यावेळी सर्व योजनांची कामे मार्च २०२५ अखेर पूर्ण करुन १०० % खर्च नोंदविणेबाबत सूचना दिल्या. सर्व विभागांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.या सभेसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसेच पंचायत समित्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

