संदीप लहांगे,डहाणू,
पालघर येथे कोस्टल रिसिलियन्स’ व जलवायू बदलावर चर्चासत्र संपन्न,
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ” कोस्टल रिसिलियन्स आणि स्ट्रेंथनिंग डिझास्टर अँड क्लायमेट चेंज अडक्शन इन पालघर डिस्ट्रिक्ट,” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमास पालघरकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इंडसइंड बँकच्या सीएसआर इनिशिटिव्ह अंतर्गत संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या कोस्टल रिस्क रिडक्शन,या उपक्रमाला पाठिंबा देत,या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
चर्चासत्रात पालघर व डहाणू तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक नागरिक सहभागी उपस्थित होते.यामध्ये ग्रामविकास अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी,प्राध्यापक आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी महेश सागर यांच्या उपस्थितीत झाले. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचे विश्लेषण केले व भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांविषयी माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी विवेकानंद कदम यांनी जिल्ह्याची धोकेविषयक प्रोफाईल आणि किनारपट्टी भागातील आपत्ती व त्यावरील उपाययोजना सांगितल्या .
यावेळी मंत्रालयातील वैशाली मस्के आणि चंद्रकांत ओझा यांनी विकासात्मक नियोजनात आपत्ती जोखीम कमी करणे व जलवायू बदलाचे व्यवस्थापन,यावरील सखोल माहिती दिली.
आयोजनात आगाखान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाचे वरिष्ठ प्रकल्प प्रमुख संतोष कुमार,वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक सचिन मर्ती, प्रकल्प व्यवस्थापक भूपेंद्र मिश्रा,प्रकल्प समन्वयक ऋतुजा नाईकडे आणि इतर सहकारी श्रीनिवास कीर्तने, ज्योती राऊत,प्रज्ञा चुरी, जयेश बैसाने,जयदेव माच्छी, अमृत बेंडगा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चर्चासत्रादरम्यान ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन समित्या अधिक बळकट करणे,नागरिकांना जागरूक करणे,तसेच पूर्वनियोजनाद्वारे संभाव्य धोके कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.हा उपक्रम जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची गरज अधोरेखित करत,आपत्ती जोखमींविषयी व्यापक जनजागृती करण्यासाठी यशस्वी ठरला आहे .

