अनिल वैद्य,नाशिक,
नाशिक येथे राज्य सबज्युनियर आर्चरी स्पर्धा : ६०० धनुर्धारांचा सहभाग,
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली आणि नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे येत्या २१ ते २३ डिसें.दरम्यान नाशिकमध्ये सब ज्युनियर वयोगटातील मुले व मुलींच्या २३ व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धनुर्धरांचा सहभागी होणार आहेत.या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा थरार नाशिककरांना अनुभवयास मिळणार आहे,अशी माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर,सेवक संचालक सी.डी.शिंदे, शिक्षणाधिकारी प्रा.डॉ. भास्कर ढोके,नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या सचिव मंगल शिंदे,खजिनदार संजय होळकर उपस्थित होते.
शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धा इंडियन राउंड,रिकर्व्ह राउंड आणि कंपाउंड राउंड,या प्रकारात घेण्यात येणार आहेत.या स्पर्धेत राज्यभरातील ३५ जिल्ह्यांमधून एकूण ६०० धनुर्धर,मार्गदर्शक, व्यवस्थापक,पंच व पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.या सर्वांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे करण्यात आली आहे,अशी माहिती संजय होळकर यांनी यावेळी दिली.
स्पर्धा यशस्वी करण्यासह ऐतिहासिक नाशिक शहराचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने स्पर्धेतील सहभागींना मिळण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजन समिती अध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे आणि सचिव मंगल शिंदे यांच्या नियंत्रणाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र आर्चरी संघटनेचे अध्यक्ष अॅड.प्रशांत देशपांडे,महासचिव प्रमोद चांदुरकर यांच्यासह राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि सचिव यांचा सहभागही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, पोलिस मुख्यालय यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील धनुर्धर, कोचेस,पालक आणि धनुर्विद्या प्रेमी विशेष प्रयत्न करत आहेत.नाशिक जिल्ह्यातून गुणवत्ताधारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने या स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत.नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेतील धनुर्धरांच्या थराराची अनुभूती घेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन स्पर्धा आयोजन समितीचेअध्यक्ष अॅड.नितीन ठाकरे आणि सचिव मंगल शिंदे यांनी केले आहे.
कोट –
अनेक राष्ट्रीय पदक विजेते धनुर्धर राज्यास देणाऱ्या नाशिक जिल्ह्यास तब्बल १२ वर्षानंतर राज्यस्तरीय धनुर्विद्या ( आर्चरी ) स्पर्धा आयोजनाचा सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे.
मंगल शिंदे,सचिव,नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटना, नाशिक,

