सुरेश वैद्य, पालघर,
जिल्ह्यातील खेळाडूनी शालेय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करावी,
शैक्षणिक वर्षांमध्ये पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,पालघर यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या, शालेय क्रीडा स्पर्धांचा आराखडा मांडण्यात आला असून शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन उत्तम कामगिरी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर,यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा क्रीडा शिक्षक सभा आयोजीत करण्यात आली होती.यावेळी पालघर जिल्ह्यातील ४५० क्रीडा शिक्षक या सभेला उपस्थित होते.
अगदी शेवटच्या घटकापर्यंत क्रीडा विभागाची माहिती व ज्ञान असावे,या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे ( वेबसाईट ) उद्घाटन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्षा डॉ इंदु राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले.
या संकेतस्थळावरून पालघर जिल्ह्यामध्ये क्रीडा विभागामार्फत,राबवण्यात येणारे विविध उपक्रम,विविध योजना,यांची परिपूर्ण माहिती, या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामध्ये खेळाडू हा केंद्रबिंदू मानून,क्रीडाविषयक बाबींवर जास्तीत जास्त भर दिला गेला आहे.राज्य शासन व केंद्र शासनातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम व योजना यांची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्या वतीने,जे काही उपक्रम राबवण्याबाबतचे निर्देश दिले जातात,त्याचे देखील यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये, विद्यार्थी,विद्यार्थिनींना,युवक युवती,खेळाडू,तसेच पालघर जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या,एकविध खेळ संघटनेच्या,क्रीडा संघटना या सर्वच घटकांना सोबत घेऊन, पालघर जिल्ह्यामध्ये ” श्वास क्रीडा ध्यास क्रीडा,”या उक्तीप्रमाणे या संकेतस्थळाच्या माध्यमातून वसई विरारपासून तलासरी ते मोखाडा,या अत्यंत दुर्गम व आदिवासी भागामधील शेवटच्या घटकापर्यंत क्रीडा विषयी बाबींची माहिती होण्यासाठी,या संकेतस्थळाचा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्याची माहिती,अर्जांचे नमुने, आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना व उपक्रम याचा लाभ घेणं सहज शक्य व सोपे होणार आहे.
शालेय क्रीडा स्पर्धा अथवा क्रीडा विषयक बाबींमधील अनेक उपक्रम असतील तर क्रीडा शिक्षकांना किंवा क्रीडा प्रेमींना तसेच ग्रामपंचायती शासकीय अनुदानित शाळा व आश्रमशाळा असतील तर या सर्वांनाच या संकेतस्थळाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी,गिरीश एरणाक, अमृत घाडगे,मयूर कॉलम जयवंती देशमुख,प्रितेश पाटील,चेतन मोरे,सरिता वळवी प्रणवते,गावंडे पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा केंद्रप्रमुख व जिल्हा क्रीडा समन्वयक तसेच निवृत्त क्रीडा शिक्षक आदी सहभागी झाले होते.

