जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे अंगणवाड्यांमध्ये भव्य खेळ मेळावे संपन्न,
जागतिक खेळ दिनाचे औचित्य साधून जव्हार तालुक्यातील विविध गावांतील अंगणवाड्यांमध्ये खेळ मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले hote.जे.एस.डब्ल्यू. आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत हे कार्यक्रम साजरे झाले.
या उपक्रमात पारंपरिक आणि आधुनिक खेळांचे सुंदर मिश्रण असलेले विविध स्पर्धात्मक आणि मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले.मोठ्या गटांचे खेळ,बैठक खेळ,काल्पनिक आणि संगीतावर आधारित खेळ,शारीरिक खेळ तसेच मुक्तपणे खेळता येणारे अनेक प्रकार अनुभवायला मिळाले. खो-खो,कबड्डी,लंगडी, रस्सीखेच,सायकल शर्यत, मटकाफोड,लिंबू-चमचा शर्यत, धावण्याच्या शर्यती,अशा पारंपरिक खेळांनी वातावरण आनंदमय झाले होते.
बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या कविताचे सादरीकरण,गोष्टींचे सादरीकरण व भूमिकानिवेशन यांचाही समावेश यामध्ये करण्यात आला होता. खेळाच्या या माध्यमातून लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांच्यातील गतिशीलता, सहकार्य,समवयस्कांशी सुसंवाद आणि नेतृत्वगुण यांचा विकास घडून आला.
कार्यक्रमात गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर्स, शिक्षक,स्वयंसेवक,विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक सहभागी झाले होते. उपस्थितांना बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळाचे महत्त्व विशद करण्यात आले. खेळांमुळे शारीरिक आरोग्य तर जपले जातेच,पण मानसिक आणि सामाजिकदृष्ट्याही मुलांचा चांगला विकास होतो, हे उदाहरणातून अधोरेखित झाले.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व जे.एस.डब्लू.यांचा हा उपक्रम ग्रामीण पातळीवर खेळ संस्कृती रुजवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. अंगणवाड्यांमधील बालकांना आनंददायी शिक्षणाच्या वाटेवर नेणारा हा खेळ मेळावा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला.

