वसंत भोईर,वाडा
भारतीय युवकाने घडवला परकिय भूमीवर इतिहास ; तब्बल तीस तास धावला,
तालुक्यातील नेहरोली येथील रहिवासी असलेला
कुणाल विजयकुमार पाटील या जिद्दी तरुणाने नुकतीच इटली या देशामध्ये डोलोमाईट एक्स्टरीम ट्रेल रन ही जगातील प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा नुकतीच पार पडली.या स्पर्धेत तो तब्बल तीस तास धावून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले.
ही स्पर्धा इटलीमधील जगप्रसिद्ध डोलोमाईट डोंगररांगांतून धावण्याची असते.अंतर असते १०३ किलोमीटर,ही स्पर्धा केवळ धावण्याची नसून,डोंगर रांगांतून चढउतार करत हे अंतर पूर्ण करायची असते. अत्यंत कठीण डोंगर पायवाटा,नद्या,नाले,ओढे, जंगले पार करत धावावे लागते.काही ठिकाणी उतार एव्हढे तीव्र होते की आयोजकांनी खडकांना केबल बांधल्या होत्या,त्यापकडून काळजीपूर्वक खाली उतरावे लागते.पाय घसरला की अपघात होऊ शकतो.चढण इतकी तीव्र की हिमालयीन पर्वतांसारखी चढ ( एलेव्हेशन ७१०० ) इतका असतो.काही ठिकाणी तर चढण्यासाठी शिड्या लावल्या होत्या. स्पर्धकांच्या शारिरीक क्षमतेची कसोटी लागणाऱ्या या स्पर्धेत धावत होता,एकमेव भारतीय तरुण ” कुणाल,”स्पर्धा रात्री दहा वाजता म्हणजे भारतीय वेळ रात्री दिड वाजता सुरु झाली.बंदुकीचा बार होताच,सत्तर देशांतून आलेल्या स्पर्धकांनी धावायला सुरुवात केली.काही वेळ सर्व सुरळीत चालले,पण कुणालचे दुर्दैव आडवे आले.पंचवीस किलोमीटर धावल्यावर कुणालचा बूट फाटला व सोल वेगळा झाला.प्रचंड वेगाने वाहणारे वारे,अत्यंत थंड तापमान,डोंगर उतार, खाच खळगे,दगडगोट्यांचा मार्ग, अनवाणी धावणं शक्यच नव्हते.या बहादुर युवकाने, त्यांना जखम झाली तर बांधण्यासाठी दिलेले बॅण्डेज काढले व आपला फाटलेला बूट तळव्यासह बांधला,परंतू तो फार काळ टिकत नव्हता, सतत थांबून तो बांधावा लागत असे,असे करत त्याने पंचावन्न किलोमीटरचा टप्पा गाठला.तेथे तो आयोजकांनी ठेवलेल्या मदत केंद्रात गेला, बूट वापरण्यासारखा राहिला नव्हता.तेथील स्वयंसेवकांनी त्याला धीर देऊन व धावपळ करून बूट उपलब्ध करून दिले.आता साइज जमेना नवी समस्या जाणवू लागली.पण त्याने जिद्द सोडली नाही.बूट घालून तो परत धावू लागला.परंतू बूट नवे व साइजचे नसल्यामुळे बूट पायाला घासू लागले व त्यामूळे ब्लिस्टर म्हणजे पाण्याचे फोड आले,पुन्हा एकदा नवी समस्या उदभवली,आता स्पर्धा सोडून द्यावी,असे कुणालला वाटू लागले,तोच त्याच्या पाठीमागून येणाऱ्या इटलीच्या वयस्कर अनुभवी स्पर्धकाने त्याची परिस्थिती अचूक ओळखली,त्याने कुणालला धीर दिला,मी तुझ्यासोबत असेन स्पर्धा सोडू नको, कुणालने पुन्हा हिंमत करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.अखेर तब्बल तीस तास धावल्यानंतर शेवटचे ठिकाण आले व टाळ्यांच्या गजरात पदक गळ्यात पडले.तोपर्यंत इटलीमधील नागरिक त्यांचे स्वागत करण्यासाठी जमा झाले होते.एकमेव भारतीय तरुण ही स्पर्धा धावतो आहे,हे समजल्यावर इटलीमधील भारतीय समुदाय मोठ्या उत्साहाने जमा झाला होता. त्या सर्वांनी कुणालवर पुष्पगुच्छ,भेटवस्तू व शुभेच्छांचा वर्षाव केला.सहभागी झालेल्या सर्व देशांचे ध्वज तेथे फडकावले जातात.आपला तिरंगाही तेथे दिमाखात फडकत होता.ही स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
कुणाल विजयकुमार पाटील,हा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील रहिवासी आहे.भिवंडी – वाडा रस्त्यावर असलेले नेहरोली,हे त्याचे मूळ गाव आहे.
आतापर्यंत त्याने अनेक जागतिक ख्यातीच्या स्पर्धांमध्ये धावून पदके मिळवली आहेत.
१ – युन्फ्रा मॅरेथॉन स्वित्झर्लंड.
२ -अथेन्स मॅरेथॉन ग्रीस (ही मूळ मॅरेथॉन आहे.)
३ – बर्लिन मॅरेथॉन जर्मनी.
पर्वत रांगांमधून धावण्याची स्पर्धा (ट्रेल)
१ – ज्युलियन आल्प्स अल्ट्रा ट्रेल,स्लोव्हेनिया ८० किलोमीटर,एलेव्हेशन ३६००,
२ – पिनानी अल्ट्रा ट्रेल पोलंड ६५ किलोमीटर, एलेव्हेशन ३२००,
३ – डोलोमाईट एक्स्ट्रिम ट्रेल रन,१०३ किलोमीटर, एलेव्हेशन ७१००,
मूळचा सायकलपटू असणाऱ्या बहाद्दराने मुंबई मधील ख्यातनाम
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून उच्च शिक्षणासह केमिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली आहे.

